भाजपमध्ये "हार्दिक" स्वागत

Update: 2022-06-02 08:30 GMT

गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपावर सडकून टिका करणारे पाटीदार आंदोलनाचा चेहरा राहिलेले हार्दिक पटेल आज भाजपात प्रवेश करत आहेत. गुजरातमधील भाजपा प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील यांच्या उपस्थितीत ते भाजपात प्रवेश करणार आहेत. भाजपामध्ये प्रवेश करण्याआधी हार्दिक पटेल यांनी सकाळी ट्विट करत आपण देशसेवेच्या उदात्त कार्यात एक छोटा शिपाई होऊन काम करणार असल्याचं म्हटलं आहे.

माजी काँग्रेस नेता हार्दिक पटेल यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, "राष्ट्रहित, राज्यहित, जनहित आणि सामाजिक हित या भावनेतून मी आजपासून एका नव्या अध्यायाला सुरुवात करणार आहे. भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशसेवेच्या उदात्त कार्यात मी एक लहान सैनिक म्हणून काम करेन".

काँग्रेस पक्षाला रामराम ठोकल्यानंतर हार्दिक पटेल यांनी काँग्रेस नेतृत्व आणि पक्षाची काम करण्याची पद्धत यावर जोरदार टीका केली होती. मी काँग्रेसमध्ये तीन वर्षे वाया घालवली, अशी प्रतिक्रिया पटेल यांनी दिली होती.हार्दिक पटेल यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांना पाठवलेल्या राजीनामा पत्रात प्रदेश काँग्रेस नेत्यांबरोबरच शीर्ष नेतृत्वालाही लक्ष्य केलं होतं. ''गुजरात आणि गुजरातींबद्दल द्वेष असल्यासारखे पक्षाच्या नेतृत्वाचे वर्तन होत़े मी अनेकदा गुजरातमधील समस्यांकडे नेतृत्वाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला़ मात्र, जेव्हा-जेव्हा पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना भेटून काही मुद्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचे मोबाइलवर अधिक लक्ष असल्याचे आढळल़े काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाकडे गांभीर्याचा अभाव असल्याचे दिसले'', अशी टीका करत हार्दीक पटेल यांनी राहुल गांधी यांना लक्ष्य केल़े देशाला किंवा पक्षाला गरज असताना काही नेते परदेशात मौजमजा करत होते, अशी टिप्पणीही हार्दिक यांनी या पत्रात केली होती.

काँग्रेसला योग्य दिशा देण्याचा प्रयत्न केला़ मात्र, काँग्रेस केवळ विरोधाच्या राजकारणात अडकला असून, देश आणि समाजहिताविरोधात काम करत आहे, असा आरोपही हार्दिक पटेल यांनी केला होता. काँग्रेसवर टीका करताना हार्दीक यांनी अनुच्छेद ३७० हटविण्याच्या मुद्याबरोबरच राम मंदिर, जीएसटीच्या मुद्यावरून भाजपचे कौतुक केले होते.

Tags:    

Similar News