सरकारने किती डास पकडले, छगन भुजबळ यांचा विधानसभेत सवाल

डास पकडणे हे चांगले काम आहे, असं म्हणत छगन भुजबळ यांनी सरकारने किती डास पकडले? असा सवाल विधानसभेत उपस्थित केला आहे.;

Update: 2022-08-22 07:19 GMT

आरोग्य विभागाने डास पकडून त्यांचे विच्छेदन करून कोणत्या प्रकारचे डास संहारक आहेत? याबाबत माहिती दिली. त्यावरून छगन भुजबळ यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित करत आरोग्य विभागाने किती डास पकडले, असा सवाल उपस्थित केला. मात्र भुजबळ यांच्या प्रश्नाने सभागृहात खसखस पिकली.

छगन भुजबळ प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान मिश्किलपणे म्हणाले की, तुम्ही सर्वजण कठीण प्रश्न विचारतात. त्यामुळे मी आता सोपा प्रश्न विचारतो. कारण आरोग्य विभागाने दिलेल्या उत्तरामध्ये असे म्हटले आहे की, उपलब्ध कीटक संहारकाच्या मार्फत कार्यक्षेत्रात डास पकडून त्याचे वर्गीकरण करणे, त्याची घनता काढणे, विच्छेदन करणे हे काम केले, असे सांगितले. त्यावरून छगन भुजबळ म्हणाले की, हे अत्यंत चांगले काम आहे. पण माझा प्रश्न आहे की, आरोग्य विभागाने किती डास पकडले? त्यांचे विच्छेदन केल्यानंतर त्यापैकी किती डास नर आणि किती डास मादी होते? तसेच डासांच्या विच्छेदनातून अतिशय संहारक नेमकं नर डास की मादी डास आहे. याविषयीचा अहवाल आपल्याकडे आला आहे का? असा सवाल छगन भुजबळ यांनी उपस्थित केला. त्यावरून सभागृहात हशा पिकला.

यावर विधानसभाअध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले की, यावर संशोधन करण्यासाठी थोडा वेळ द्यावा लागेल. तर आरोग्यमंत्री तानाजी सावंत म्हणाले की, डास पकडले आहेत. त्यामुळे त्याची माहिती घेऊन मी ती पटलावर ठेवतो.

मात्र छगन भुजबळ यांनी अधिकाऱ्यांकडून देण्यात आलेल्या उत्तरावर उपरोधिक प्रश्न विचारल्यामुळे सभागृहात हशा पिकला होता.

Full View

Tags:    

Similar News