पालकमंत्र्यांनी आपल्यावर हल्ला घडवून आणला, गोपीचंद पडळकर यांचा आरोप

Update: 2021-12-26 05:50 GMT

सांगली : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा सांगलीचे पालकमंत्री आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. सांगली जिल्ह्यातील आटपाडी येथे 7 नोव्हेंबर रोजी आपल्यावर झालेला हल्ला पूर्वनियोजीत होता, तसेच यामागे सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील, पोलीस अधीक्षक दिक्षित कुमार गेडाम आणि अप्पर पोलीस अधीक्षक मनिषा डुबुले यांचा हात आहे, असा आरोप पडळकर यांनी केला आहे. पडळकर यांनी त्यावेळी घडलेल्या घटनेचा एक व्हिडिओ प्रसिद्ध केला असून त्याआधारे आरोप केले आहेत. आटपाडी येथे 7 नोव्हेंबर रोजी सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या वादातून मारामारी झाली होती. भाजपा आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यामध्ये हा संघर्ष झाला होता. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि शिवसेनेचे नेते तानाजी पाटील यांच्यासह दोन्ही गटातील 10 लोकांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते. आटपाडी पोलीस ठाण्यात पडळकर आणि पाटील यांच्या विरोधात खुनाचा प्रयत्न केल्याबाबतचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याच्या अंगावर गाडी घालून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याबद्दल पडळकर यांच्यावर आटपाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. याबाबत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते राजू जानकर (वय 29, रा. भेंडवडे, ता. खानापूर) यांनी आटपाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. तर राज्यभर एसटी कर्मचाऱ्यांचे आम्ही आंदोलन उभे केल्याने आपल्यावर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत, असा दावा त्यावेळी आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला होता.

दरम्यान राज्य सरकारने भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांची मानसिक अवस्था सरकारी खर्चातून तपासावी, अशी मागणी आरपीआयच्या खरात गटाचे सचिन खरात यांनी केली आहे. भाजपा आमदार वेळोवेळी पवार कुटुंब आणि जयंत पाटील यांच्यावर आरोप करत आहेत. वैयत्तिक भांडणांमुले पडळकर यांच्या जीवाला दोका असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते, सुरक्षा दया अशी मागणी केली होती. राज्य सरकारने सुरक्षा दिली असताना ती नाकारून उलट पवार कुटुंब आणि जयंत पाटील यांच्यावर गंभीर आरोप पडळकर यांनी केले आहेत. त्यामुळे पडळकर यांची मानसिक अवस्था ढासळल्याचे दिसत आहे, अशी टीका सचिन खरात यांनी केली आहे.

Tags:    

Similar News