गुजराती आणि राजस्थानी मुंबईबाहेर गेले तर मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही असे सांगुन वाद निर्माण करणारे राज्यपाल भगतसिंह कोशारी अखेर नरमले आहे.. मोठा वाद आणि टिका झाल्यानंतर त्यांनी अखेर माफीनामा सादर केला आहे. अलिकडच्या काळात माफी मागणारे राज्यपाल कोशारी हे पहिलेच राज्यपाल ठरले आहेत. राज्यपालाच्या वक्तव्यानंतर राजकीय गदारोळ निर्माण झाला होता. सत्ताधारी शिंदे- फडणवीस सरकारनेदेखील राज्यपालांच्या वक्तव्यापासून फारकत घेतली होती. टिका झाल्यानंतर राज्यपालांनी पत्रक काढून माझ्या वक्तव्याचा विपर्यास झाल्याचं सांगितलं होतं. तरीही टिका झाली आहे...
दिनांक २९ जुलै रोजी अंधेरी येथे झालेल्या एका सार्वजनिक कार्यक्रमात मुंबईच्या विकासात देशातील काही समाज बांधवांच्या योगदानाचे कौतुक करताना माझ्याकडुन कदाचित काही चुक झाली. महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देशाच्या विकासात सर्वांचेच उल्लेखनीय असे योगदान आहे. विशेषतः संबंधित राज्याची सर्वसमावेशकता व सर्वांना सोबत घेऊन वाटचाल करण्याची आपली उज्वल परंपरा यामुळेच आज आपला देश प्रगती पथावर अग्रेसर होत आहे.
गेल्या जवळपास तीन वर्षांत मला राज्यातील जनतेचे अपार प्रेम मिळाले आहे. आपल्या वतीने मी महाराष्ट्र आणि मराठी भाषेचा गौरव वाढवण्याचा कसोशीने प्रयत्न केला. परंतु, त्या दिवशीच्या भाषणात माझ्याकडून निर्हेतुकपणे काही चूक झाली असेल तर त्या चुकीला या थोर महाराष्ट्र राज्याचा अवमान समजला जाईल ही कल्पना देखील मला करवत नाही.
महाराष्ट्राच्या महान संतांच्या शिकवणीला अनुसरून राज्यातील जनता या विनम्र राज्यसेवकाला क्षमा करुन आपल्या विशाल अंतःकरणाचा पुनर्प्रत्यय देईल असा विश्वास बाळगतो, असे भगत सिंह कोश्यारी म्हटले आहे.