राज्यपाल भगत सिंह कोश्यारी आणि राज्य सरकारमध्ये आता नवीन विषयावरुन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईतील साकीनाका परिसरात झालेल्या बलात्कार प्रकरणामुळे वातावरण तापले आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विधिमंडळाचे दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावण्याचे निर्देश दिले आहेत. या विशेष अधिवेशनात महिलांची सुरक्षा आणि कायदा व सुव्यवस्था या मुद्द्यांवर चर्चा करण्यात यावी, असे निर्देश राज्यपालांनी दिले आहेत. यासंदर्भात राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले आहे.
पण आता राज्यपालांच्या या भूमिकेला सरकार काय. उत्तर देते ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. विधिमंडळाचे अधिवेशन घेण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळ घेत असते. मात्र, राज्यपालांनी सूचना केल्यानंतर ती राज्य सरकारवर बंधनकारक आहे का किंवा राज्य सरकार असे विशेष अधिवेशन घेणार का, अशी चर्चा आता सुरू झाली आहे.