राज्यपाल भगतसिंह कोश्यारी नांदेड दौऱ्यावर
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी तीन दिवसीय नांदेड दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठातील कार्यक्रमांना हजेरी लावली
राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे तीन दिवसीय नांदेड दौऱ्यावर आहेत. राज्यपाल कोश्यारी नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. नांदेडमधील स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठातील कार्यक्रमांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी हजेरी लावली.
विद्यापीठातील विविध विभागांना ते भेट देणार आहेत. तर ते उद्या हिंगोली आणि परवा परभणी असा दौरा करणार आहे. महाविकास आघाडीनं राज्यपालांच्या दौऱ्यावर नाराजी व्यक्त केल्यानंतरही दौरा होत असल्यानं त्यांच्या दौऱ्याकडे सगळ्यांच लक्ष लागलंय.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यपालांच्या दौऱ्याबाबत प्रतिक्रिया देतांना राज्यपालांनी नको त्या गोष्टीत लक्ष घालू नये. भाजपशासित प्रदेशामध्ये राज्यपाल दौरे करतांना दिसत नाही मात्र, महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमध्ये मात्र राज्यपाल गाव दौरे करत आहेत असं म्हटलं होतं.
शिवाय राजभवन हे राज्य सरकारच्या मदतीसाठी असतं , राज्य सरकारचे पाय खेचण्यासाठी नाही अशी टीका देखील राऊत यांनी केली होती.
त्यामुळे आता राज्यपाल कोश्यारी यांच्यावर दौऱ्यावरून टीका होत असतांना त्यांच्या या दौऱ्याकडे संपुर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.