राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नियुक्तीचा प्रश्न सुटण्याची शक्यता आहे, सुत्रांनी मॅक्स महाराष्ट्रला दिलेल्या माहितीनुसार याबाबतचा निर्णय अंतिम टप्प्यात आहे. या संदर्भात उद्या 26 ऑगस्ट ला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री राज्यपालांना भेटण्याची श्यक्यता आहे.
मात्र. या १२ नावांमध्ये एकनाथ खडसे यांचे नाव आहे की नाही याबाबत अजूनही माहिती मिळालेली नसल्याने एकनाथ खडसेंचे काय होणार अशी चर्चा आता सुरू झाली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यपालांकडे हा प्रस्ताव प्रलंबित असल्याने हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवरील सुनावणी दरम्यान काही दिवसांपूर्वी कोर्टाने राज्यपालांना याबाबत खडसावले होते. राज्यपालांना कोर्ट आदेश देऊ शकत नाही. राज्यपालांनी काय निर्णय घ्यावा हा त्यांचा अधिकार आहे, त्यात कोर्ट हस्तक्षेप करणार नाही पण निर्णय घ्यावा लागेल, तो मुद्दा प्रलंबित ठेवता येणार नाही, या शब्दात कोर्टाने फटकारले होते.
कोर्टाच्या या आदेशानंतर गेल्या आठवड्यात राज्यपालांनी या विषयावर चर्चेची तयारी दाखवल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली होती. पुण्यात पत्रकार परिषदेत बोलताना अजित पवार यांनी राज्यपालांनी मुख्यमंत्री आणि आपल्याला १२ आमदारांच्या मुद्द्यावर चर्चेसाठी निमंत्रण दिल्याची माहिती दिली होती. त्यामुळे आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे राज्यपालांना याच आठवड्यात भेटण्याची शक्यता आहे. त्यामुळे १२ आमदारांच्या नियुक्तीचा प्रश्न तातडीने सुटण्याची शक्यता आहे.