नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करणारे राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नुकतचं गुजराती, राजस्थानी मुंबईतून गेले तर मुंबई देशाची आर्थिक राजधानी राहणार नाही असं वक्तव्य करुन मोठा वाद ओढवून घेतला होता. मोठी टिका झाल्यानंतर माफी मागीतली आता गुजराती व्यासपीठावर देशातील राष्ट्रीयतेचा भाव वृद्धिंगत करण्यासाठी प्रत्येकाने आपली सांस्कृतिक ओळख जपताना स्थानिक संस्कृतीशी एकाकार होऊन महाराष्ट्रात असताना मराठी भाषा शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे सांगत राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी पुन्हा बाजू सावरण्याचा प्रयत्न केला आहे.
राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी नेहमीच वादात सापडत आहे. पुणे विद्यापीठाच्या कार्यक्रमात महात्मा फुले- सावित्रीबाई फुलेंबाबत बदनामकारक वक्तव्य त्यांनी केलं होतं. त्यानंतर रामदास स्वामी नसते तर छत्रपती शिवाजी महाराज नसते असं गैरऐतिहासिक वक्तव्य करुन वाद ओढवून घेतला होता. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना राज्यसरकारला अडचणीत आणण्याची एकही संधी राज्यपाल सोडत नव्हते. त्यामुळे सत्तांतर होताच त्यांनी प्रोटोकोल सोडून नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पेढे भरवले होते.
अलिकडेच मुंबईत एका चौकाच्या उद्घाटनाला गेले होते, तिथे राजस्थानी आणि गुजराती मुंबईतून गेले तर मुंबई देशाची आर्थिक राजधानी राहणार नाही असं वक्तव्य केलं. त्यानंतर सत्ताधारी शिंदे- फडणवीस सरकारह सर्व समाजघटकांमधून राज्यपालांवर टिकेचा भडीमार झाला. त्यानंतर त्यांनी माफीपत्र जारी केलं. आज पुन्हा राज्यपालांच्या हस्ते गुजराती सांस्कृतिक फोरमचे पुरस्कार प्रदान झाले. यावेळी अभिनेते दिलीप जोशी, जन्मभूमीचे कुंदन व्यास यांसह विविध क्षेत्रातील गुणवंत सन्मानित करण्यात आलं.
भारत हा सुंदर पुष्पगुच्छाप्रमाणे विविधतेने नटलेला देश आहे. प्रत्येक राज्याची वेशभूषा, भाषा इत्यादी बाबतीत स्वतंत्र ओळख असली तरीही सर्व भारतीयांना जोडणारे राष्ट्रीय चारित्र्य समान आहे. देशातील राष्ट्रीयतेचा भाव वृद्धिंगत करण्यासाठी प्रत्येकाने आपली सांस्कृतिक ओळख जपताना स्थानिक संस्कृतीशी एकाकार झाले पाहिजे, तसेच महाराष्ट्रात असताना मराठी भाषा शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी येथे केले.
एकंदरीत मोठ्या टिकेचे धनी बनलेले राज्यपाल अजून छोट्यामोठ्या कार्यक्रमांना हजेरी लावत असून एका गुजराती कार्यक्रमाचे निमित्त साधून त्यांनी आपल्या
चुकीचे परीमार्जन करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते. राज्यपालांच्या मराठी अस्मिताविरोधी वक्तव्यानंतर दिल्लीतील केंद्रीय भाजप नेतृत्व आणि मोदींकडून राज्यपालांना योग्य संदेश दिला असल्याचीही चर्चा आहे.