शरद पवार आणि संजय राऊत ह्या फाटक्या आणि जीर्ण नोटा- गोपीचंद पडळकर
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे फाटक्या आणि जीर्ण झालेल्या नोटा आहेत. याकडे राज्यातील जनतेने फारसे लक्ष देवू नये, अशी टिका विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली. ते धुळे येथे आयोजित कोळी समाजाच्या आक्रोश मार्चात बोलत होते.;
आज धुळ्यामध्ये कोळी समाजाच्या विविध मागण्यांसाठी आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत कोळी समाजाची सभा धुळ्यामध्ये पार पडली. या सभेत गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार आणि संजय राऊत यांच्यावर टिकास्त्र सोडले. राज्यात विविध जमातींच्या विविध प्रश्नांवरती पवारांनी घाण आणि नीच राजकारण केल्याचा आरोप यावेळी गोपीचंद पडळकर यांनी केला. आदिवासी कोळी समाजाच्या प्रश्नांवर आदिवासी विकास मंत्रीच गौड बंगाल करत असल्याचा घणाघाती आरोप करीत यावेळी आमदार गोपीचंद पडळकर यांनी आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांच्यावर निशाणा साधत सरकारला घरचा आहेर दिला.
आदिवासी जमातीसह ३३ जमातींवरती अन्याय करायला पवारांनी काही लोकं जवळ ठेवली होती आणि ती आदिवासी जमातीचीच होती. धनगर समाजाच्या आरक्षणास विरोध करणारे लोक देखील शरद पवारांच्या जवळचेच होते. या सर्वांचा सूत्रधार एकच आहे. म्हणून मी दर वेळेस पवारांवर बोलतो, असे पडळकर यावेळी म्हणाले. शरद पवारांनी आधीपासूनच घाण व निच काम केले आहे, असे म्हणत आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांवर घणाघाती आरोप लावत निशाणा साधला. सरकार पडणार असे म्हणणाऱ्या विरोधकांवर निशाणा साधत गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार व संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला.
शरद पवार व संजय राऊत या जीर्ण झालेल्या फाटक्या नोटा आहेत. या चलनात न चालणाऱ्या नोटा आहेत. म्हणून त्यांच्याकडे लक्ष देऊ नका, राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार हे फुल स्ट्रॉग आहे. शरद पवारांचा चेहरा अगोदरच विश्वासघाताने, गद्दारीने, पाठीत खंजीर खुपसण्याने काळवंडलेला होता. मागच्या महिन्यामध्ये त्यांच्याच पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी त्यांच्यावरती शिक्कमोर्तब केले होते. देवेंद्र फडणवीस साहेबांनी एकच वाक्य टाकल्यामुळे शरद पवारांचा मूळचा काळवंडलेला चेहरा आता डांबरा सारखा काळा झाला, असे मला या विषयात वाटते असे म्हणत पडळकर यांनी पहाटेच्या शपथविधीवर बोलताना शरद पवारांवर निशाणा साधला. आणि पहाटेचा शपथविधी हा शरद पवार यांच्या सांगण्यावरुन झाल्याचे सुद्धा पडळकर यावेळी म्हणाले.