खडसेंच्या मुलाची आत्महत्या की खून ? गिरीश महाजन यांच्या वक्तव्याने नवा वाद

भाजप नेते गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यात वाद काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाही. त्यापार्श्वभुमीवर गिरीश महाजन यांनी थेट एकनाथ खडसे यांच्या मुलाची आत्महत्या की खून? असा सवाल केला आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यात नवा वाद निर्माण झाला आहे.

Update: 2022-11-22 06:34 GMT

भाजपचे नेते गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे (Girish Mahajan Vs Eknath Khadse) यांच्यातील वाद आता अत्यंत खालच्या पातळीवर पोहचला आहे. या वादात विकासाचा मुद्दा बाजूला पडला आहे. यामध्ये एकमेकांवरील भ्रष्टाचाराच्या आरोपापासून सुरू झालेला वाद कौटुंबिक पातळीपर्यंत पोहचला आहे. त्यातच गिरीश महाजन यांनी थेट एकनाथ खडसे यांच्या मुलाच्या मृत्यूबाबत शंका व्यक्त केली आहे.

एकनाथ खडसे यांनी काही दिवसांपूर्वीच गिरीश महाजन यांना मुलगा नाही, मुली आहेत. पत्नी राजकारणात असून नगराध्यक्ष आहे. त्यामुळे त्यांनी घराणेशाही वर बोलू नये असं वक्तव्य केले होते. महाजन यांना मुलगा नाही, असं खडसेंनी डिवचल्यानं महाजन यांनी खडसेंच्या मुलाची आत्महत्या की खून ? असा सवाल करत माध्यमांसमोर घेरले आहे.

महाजन नेमके काय बोलले?

एकनाथ खडसे आजकाल काय बोलत आहेत त्याच भान त्यांना नाही. ते आता बेभान झालेले आहेत. कधी रस्त्यावर उभे राहून हातात दगड घेतात. तर कधी मला चावट म्हणतात. त्यांना हवी तशी बदनामी करत आहेत. त्यांच्यावर आज आलेल्या परिस्थितीमुळे त्यांची मानसिक स्थिती बिघडली आहे, असा घणाघात मंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्यावर केला.

भोसरी प्रकरण, जिल्हा दुध संघ प्रकरण यासारख्या त्यांच्या अनेक चौकशा सुरू आहेत आणि त्यात सबळ पुरावे मिळत आहेत. त्यामुळे खडसे अस्वस्थ झाले आहेत.

एकनाथ खडसे हे मुख्यमंत्री पदाच्या लेव्हलचे आहेत. ज्येष्ठ नेते आहेत. मात्र असं असतानाही ते कमरे खालची भाषा बोलायला लागले आहेत. मुलगा नसणं हे काही दुर्दैव नाही. मात्र मला दोन मुली आहेत. हे मात्र माझं सुदैव आहे. एकनाथ खडसे यांना मुलगा होता. त्याचं काय झालं? त्याच उत्तर खडसे यांनी द्यावं. खरं तर मला हा विषय बोलायचा नव्हता. मात्र ते जर माझ्या मुलाबाळांवर जात असतील तर..., असे मंत्री गिरीश महाजन म्हणाले. तुम्हाला एक मुलगा होता. त्याचं काय झालं? आत्महत्या झाला की खून झाला? हे तपासण्याची गरज आहे, असे म्हणत मला जास्त बोलायला लावू नका, या शब्दात गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांना इशारा दिला आहे.

एकनाथ खडसे यांचे प्रत्युत्तर

गिरीश महाजन हे अत्यंत नीच पातळीवर जाऊन टीका करीत आहे. ते हलकट मनोवृत्तीचे आहेत. माझ्या मुलाचा मृत्यू झाला त्यावेळी मी 15 किलोमीटर लांब होतो. फक्त रक्षा घरी होत्या. मी कधीही महाजन यांच्या मुलाविरोधात बोललो नाही. घराणेशाहीवर बोललो. कारण पत्नी साधना महाजन(sadhana Mahajan) या राजकारणात आहेत. महाजन यांना मुलगा असता तर तो आणि सूनही राजकारणात असते. त्यांना आशिर्वाद दिला असता, असं प्रत्युत्तर खडसे यांनी दिलं.

महाजन हे देवेंद्र फडणवीस यांच्या अगदी जवळचे आहेत. राज्यात आणि केंद्रात ते सत्तेवर आहेत. त्यांनी सीबीआय (CBI) चौकशी करावी, असं आवाहनही गिरीश महाजन यांना खडसेंनी दिलं आहे.

दरम्यान या खडसे-महाजन यांच्या या वक्तव्यावरून भाजप खासदार रक्षा खडसे ह्यांना अडचणी येऊ शकतात. रक्षा खडसे यांची सध्या तरी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली नाही. पण नेमकं त्यांची काय प्रतिक्रीया असेल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

Tags:    

Similar News