गॅस सिलेंडरच्या दराचा पुन्हा एकदा भडका...घरगुती गॅस ५० रुपयांनी महाग...
शभरात घरगुती गॅसच्या दरात ५० रुपयांनी वाढ झाली आहे. तर व्यावसायिक गॅस सिलेंडर (Gas Cylinder) ३५० रुपयांनी महाग झाले आहे. ईशान्येकडील मतदान संपताच ही भाववाढ करण्यात आल्याचे बोलले जात आहे. सरकारी तेल कंपन्यांनी एलपीजी सिलिंडरच्या दरात बुधवारी मोठी वाढ केली. यामुळे आता सर्वसामान्यांचे कंबरडे मोडणार आहे.;
सरकारी तेल कंपन्यांनी एलपीजी ( लिक्विड पेट्रोलियम गॅस ) सिलिंडरच्या दरांत बुधवारी मोठ्याप्रमाणात वाढ केली. घरगुती वापरासाठी लागणाऱ्या १४ किलोच्या सिलेंडरमध्ये ५० रुपयांनी तर व्यावसायिक वापराच्या १९ किलोच्या सिलेंडरच्या दरात ३५०.५० रुपयांनी वाढ केली आहे. यामुळे घरचे गणित बदलणार आहे. ईशान्येकडील राज्यांमधील निवडणूकीचे मतदान होताच ही भाववाढ झाल्याचे बोलले जात आहे. आणि या भाववाढीच्या विरोधात विरोधकांनी केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. सरकारी तेल कंपन्या असलेल्या इंडियन ऑईल,(Indian Oil) भारत पेट्रोलियम (Bharat Petroleum) आणि हिंदुस्थान पेट्रोलियम (Hindustan Petroleum) यांनी गॅस सिलेंडरच्या दरात वाढ केली आहे. ही दरवाढ (Price Hike) जवळपास गेल्या आठ महिन्यानंतर करण्यात आली आहे. या दरवाढीमुळे मुंबईत आता घरगुती वापराच्या सिलेंडरसाठी ११०२.५० रुपये मोजावे लागणार आहे. तर उज्ज्वला योजनेत समावेश नसलेल्या बहुतांश वापरकर्त्यांना गॅस सिलिंडरवरील (Gas Cylinder) अनुदान बंद करण्यात आले आहे. या अनुदानाचा लाभ घेणाऱ्यांसाठी सरकार २०० रुपये भरत होते. स्थानिक करांमुळे सर्व राज्यात सिलिंडरचे दर वेगवेगळे असणार आहेत.
वास्तविकपणे कंपन्यांनी प्रत्येक महिन्याला उत्पादन खर्चाचा आढावा घेऊन दरांमध्ये बदल करणे अपेक्षित आहे. मात्र गेल्या आठ महिन्यापासून असा आढावा घेण्यात आला नव्हता. यापूर्वी घरगुती सिलेंडरचे दर ४ जुलै २०२२ रोजी वाढवण्यात आले होते. आणि व्यावसायिक वापराच्या सिलिंडरमध्ये जानेवारी महिन्यात २५ रुपयांची वाढ करण्यात आली होती. या दरवाढीवरुन विरोधी पक्षांनी सरकारवर टिकास्त्र सोडले आहे. काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी केंद्र सरकारवर ताशेरे ओढत महागाईमुळे सर्वसामान्यांना आतोनात त्रास सहन करावा लागत असल्याचे सांगितले. अशा प्रकारचे ट्विट खर्गे यांनी केले आहे. तर ठाकरे गटाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी मोदी सरकारने सर्वसामान्यांना होळीची भेट दिली असल्याचे ट्विट केले आहे. या सिलेंडरच्या दरात झालेल्या वाढीमुळे रस्त्यावर मिळणाऱ्या वडापाव पासून ते हॉटेलमधील विविध पदार्थांच्या दरात वाढ होणार आहे. या दरवाढीचा फटका सर्वसामान्यांसह व्यावसायिकांना सुद्धा बसणार आहे. आगामी काळात या दरवाढीमुळे बाजारात मिळणारे खाद्यपदार्थ महागण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे पेट्रोल, डिझेल यांच्या दरात मात्र कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. एप्रिल २०२२ नंतर कंपन्यांनी वाढ केलेली नाही. २२ मे २०२२ रोजी सरकारने सीमाशुल्कामध्ये कपात केल्यामुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी झाले होते. त्यानंतर दोन्ही इंधनाचे दर अद्यापही स्थिर आहेत. मात्र सर्वसामान्य नागरिक ही लुट किती काळ सहन करणार असा सवाल विचारत आहेत. मोदी सरकारने लादलेल्या या कंबर मोडणाऱ्या महागाईची झळ प्रत्येकालाच आगामी काळात बसणार असल्याचे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी सांगितले आहे.