Foxconn Vedanta च्या वादावर उद्योग मंत्र्यांचे विरोधकांना उत्तर

Update: 2022-09-14 03:32 GMT

Foxconn Vedanta प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याबद्दल विरोधकांनी महाराष्ट् सरकारवर जोरदार टीका सुरू केली आहे. माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी याबाबत शिंदे-फडणवीस सरकारवर मंगळवारी टीकास्त्र सोडले होते. त्या टीकेला आता उद्योगमंत्री उदय सामंत यांनी उत्तर दिले आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात गुजरातपेक्षा चांगले पॅकेज देण्यात कमी का पडलो, याचे उत्तर आदित्य ठाकरे, जयंत पाटील यांनी आधी द्यावे, असा टोला उद्योगमंत्री उदय सामंत यांनी लगावला आहे. तसेच Foxconn Vedanta पेक्षा दुपटीहून अधिक गुंतवणूक असलेल्या रिफायनरीच्या गुंतवणुकीत खोडा घालू नये, अशी विनंती आपण करत असल्याचेही उदय सामंत यांनी म्हटले आहे.


राज्यात भाजपची सत्ता येताच महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला हलवण्याचे काम सुरू झाल्याचा आरोप विरोधकांनी सुरू केला आहे. पण Foxconn Vedanta च्या बाबत काय घडले याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. " राज्यात काही दिवसांपूर्वीच शिवसेना-भाजपा युतीचे सरकार आले आहे. पण त्याच दरम्यान गुजरातने अधिक चांगले पॅकेज दिल्याने आम्ही तेथे गुंतवणूक करण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे अशी भूमिका फॉक्सकॉन वेदांतने मांडली. त्यानंतर आम्ही लगेच त्यांच्याशी संपर्क साधला आणि अधिक चांगले पॅकेज देण्याची ऑफर दिली, त्यांच्याशी चर्चाही केली. पण आम्ही भरपूर प्रयत्न करूनही ते गुजरातमध्ये प्रकल्प नेण्याच्या निर्णयावर ठाम राहिले. आता दोषारोपच करायचा असेल तर मग महाविकास आघाडी सरकारच्या काळात फॉक्सकॉनला चांगले पॅकेज का देण्यात आले नाही? दोन वर्षांपासून ते गुजरातशी वाटाघाटी करीत असताना आधीच्या सरकारने त्यांचे मन का वळवले नाही? अडीच वर्षांच्या काळात राज्यात कोणती मोठी गुंतवणूक आली? याची उत्तरं त्यांना द्यावी लागतील" असे उदय सामंत यांनी म्हटले आहे.


"यापेक्षा जास्त गुंतवणूक 2014 ते 2019 या भाजपा-सेना युतीच्या सरकारच्या काळात राज्याला आली होती. हा प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याचे आम्हालाही वाईट वाटले आम्ही निराश झालो असलो तरी खचलेलो नाही. सेमिकंटक्टर क्षेत्रातील इतर कंपन्यांशी चर्चा करू आणि त्यांचे प्रकल्प महाराष्ट्रात आणू" असेही उदय सामंत यांनी म्हटले आहे.


असाच प्रकार गिफ्ट सिटीच्या बाबतीत झाल्याची आठवण उदयन सामंत यांनी करुन दिली आहे. नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी केंद्र सरकारकडून परवानगी मिळवली. महाराष्ट्रात काँग्रेसचे सरकार असूनही त्यांनी परवानगी मिळवली नाही आणि मग प्रकल्प गुजरातमध्ये गेला की, आरडाओरडा करायचा, असा टोलाही त्यांनी विरोधकांनी लगावला आहे.


वेदांताची 1.56 लाख कोटींची गुंतवणूक गेल्याबद्दल गळे काढताना नाणार रिफायनरीच्या माध्यमातून येणाऱ्या साडे तीन लाख कोटी रूपयांच्या गुंतवणुकीत तरी खोडा घालू नका, असेही उदय सामंत यांनी म्हटले आहे.

Tags:    

Similar News