केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेली टीका महागात पडण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांबद्दल कानाखाली आवाज काढण्याची भाषा वापरली म्हणून नारायण राणे यांच्या विरोधात महाड आणि नाशिक या दोन ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. नाशिक पोलिसांना नारायण राणे यांच्या अटकेचे आदेश देण्यात आले आहेत, त्यामुळे नाशिक पोलिसांचं पथक नारायण राणे यांच्या अटकेसाठी चिपळूणकडे निघालेले आहे.
जन आशीर्वाद यात्रेदरम्यान नारायण राणे आज चिपळूणमध्ये आहेत . काल पाली येथून नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात झाली होती. त्यावेळी नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. पण रात्री पत्रकार परिषदेदरम्यान नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांच्या कानाखाली आवाज काढू अशी भाषा वापरली आणि त्यामुळे मोठा वाद निर्माण झालेला आहे. नारायण राणे हे राज्यसभेचे सदस्य असल्याने पोलिस त्यांच्यावर अटकेची कारवाई कशा पद्धतीने करतात ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. नारायण राणे यांना अटक करून कोर्टापुढे आजच हजर करण्याचे आदेश देखील देण्यात आलेले आहेत. त्यामुळे आता पुढील काही तासात काय घडामोडी घडतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. नारायण राणे यांनी प्रक्षोभक वक्तव्य केले असून त्यामुळे समाजात द्वेष निर्माण होऊ शकतो , तसेच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न देखील निर्माण होऊ शकतो अशी तक्रार शिवसेनेच्या नेत्यांनी नाशिक पोलिसांमध्ये दाखल केल्यानंतर ही कारवाई सुरू झाली आहे.