Goa Election : मनोहर पर्रीकर यांच्या मुलाला भाजपच्या पहिल्या यादीत स्थान नाही
सध्या देशात पाच राज्यांमधील निवडणुकांची धूम सुरू आहे. निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर सर्वच पक्षांमध्ये तिकीट वाटपावरुन सध्या स्पर्धा सुरू आहे. महाराष्ट्राच्या राजकारणासाठी महत्त्वाच्या ठरणाऱ्या गोवा विधानसभा निवडणुकीच्या तिकीटवाटपाकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. यामध्ये सर्वाधिक चर्चा आहे ती गोव्याचे दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचा मुलगा उत्पल पर्रीकर यांना भाजपतर्फे उमेदवारी मिळणार की नाही?
पण भाजपने गुरूवारी जाहीर केलेल्या पहिल्या यादीमध्ये उत्पल पर्रीकर यांना स्थान मिळालेले नाही. गोव्याचे प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेऊन ४० पैकी ३४ जागांवरील उमेदवारांची घोषणा केली. यामध्ये पणजीमधून उत्पल पर्रीकर हे लढण्यासाठी उत्सुक होते, पण तिथे सध्याच्या आमदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. तर उत्पल पर्रीकर यांना पक्षाने आणखी २ मतदारसंघांचा प्रस्ताव दिला होता. त्यापैकी एका मतदारसंघाला त्यांनी नकार दिला आहे तर दुसऱ्या एका मतदारसंघाबाबत त्यांच्याशी बोलणी सुरू आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तसेच दुसऱ्या जागेवरुन लढण्यासाठी ते तयार होतील, अशी आशा आहे असे फडणवीस यांनी सांगितले आहे. त्याचबरोबर गोव्याचे उपमुख्यमंत्री मनोहर आजगावकर हे मडगावमधून तर मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे सँक्वेलीन इथून निवडणूक लढणार आहेत.
उत्पल पर्रीकर यांनी गेल्या काही महिन्यांपासून पणजीमधून लढण्याची तयारी केली होती. पण भाजपमध्ये कोण कुणाचा मुलगा आहे, यावरुन उमेदवारी दिली जात नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट करत, उत्पल पर्रीकर यांना पणजीमधून उमेदवारी न देण्याचे संकेत दिले होते. या वादानंतर संजय राऊत यांनी उत्पल पर्रीकर अपक्ष लढले तर त्यांना सर्व विरोधी पक्षांनी मतभेद विसरुन पाठिंबा द्यावी अशी भूमिका मांडली आहे. त्यामुळे उत्पल पर्रीकर आता काय निर्णय घेतात ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.