देशासाठी बलिदान देणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी आजचा 'महाराष्ट्र बंद' - सामना
मुंबई : लखीमपूर खेरी येथील घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंद मध्ये राज्यातील प्रत्येक नागरिकाने सहभागी होण्याचे आवाहन सामनातून करण्यात आले आहे.'सरकारविरोधी आवाज उठवणाऱ्या, न्यायासाठी झगडणाऱ्या, देशासाठी बलिदान देणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी आजचा 'महाराष्ट्र बंद' आहे.' या बंदमध्ये प्रत्येक नागरिकाने अन्नदात्याचे ऋण फेडण्यासाठी सहभागी व्हावे, असं आवाहन आजच्या सामना अग्रलेखातून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे.
सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे की, लखीमपूर खेरीत मंत्रिपुत्राने चार शेतकऱ्यांना चिरडून मारले. या निर्घृण हत्येचा साधा निषेध केंद्रातल्या मोदी सरकारने केला नाही. उलट केंद्राकडून शेतकऱ्यांना ठार करणाऱ्या गुन्हेगारांना वाचविण्याचा प्रयत्न केला जात आहे. याविरोधात देशात संतापाची लाट आहे. लोकांच्या संतापाला वाट मोकळी करून देण्यासाठी राज्यातील महाविकास आघाडीने 'महाराष्ट्र बंद'चा पुकार केला आहे असं सामनातून म्हटले आहे. सोबतच देशातील इतर राज्यांनीही महाराष्ट्र बंदचं अनुकरण करावं असं सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे.
शेतकऱ्यांच्या सांडलेल्या रक्ताला, बलिदानाला मानवंदना देण्यासाठीच हा बंद पुकारला आहे. त्यामुळे इतर राज्यांनीही या बंदचे अनुकरण केलेच पाहिजे असं सामनात म्हटले आहे.
'शेतकरी हा देशाचा आत्मा, तो नष्ट करण्याचा प्रकार सुरु आहे असं म्हणत लखीमपूर खेरीतील शेतकऱ्यांवरील हल्ला हा देशातील शेतकऱ्यांवरील हल्ला आहे. 'जय जवान, जय किसान' हा ज्या देशाचा आत्मा आहे, तो नष्ट करण्याचा हा प्रकार आहे. दोन वर्षांपासून तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकरी संघर्ष करतो आहे. दरम्यान अनेक आंदोलक शेतकऱ्यांनी बलिदान दिले. या सगळ्यांवर कडी म्हणजे लखीमपूर खेरीची भयंकर घटना असा घणाघात सामनातून करण्यात आला आहे.