मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी कोणती प्रतिक्रिया अद्याप दिलेली नव्हती. पण आता त्यांनी पहिले ट्विट केले आहे. त्यांच्या या ट्विटनंतर ते भाजपसोबत सरकार स्थापन करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार, धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण, महाराष्ट्राचा सर्वांगिण विकास आणि आमदारांच्या मतदारसंघातील विकास कामे हाच आमचा फोकस.
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 30, 2022
उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळले. त्यामुळे गुरूवारी बोलावण्यात आलेले विशेष अधिवेशन राज्यपालांनी रद्द केल्याची घोषणा केली आहे. यानंतर एकनाथ शिंदे गट महाराष्ट्रात कधी परतणार अशीही चर्चा आहे. तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस हे लवकरच सत्ता स्थापनेचा दावा करणार असल्याचेही सांगितले जाते आहे. एकनाथ शिंदे गट आणि भाजप मिळून नवीन सरकार स्थापन करणार आहे, असेही सांगितले जाते आहे. तर दुसरीकडे सोशल मीडियावर नवीन मंत्रिमंडळाची यादीही व्हायरल झाली आहे. या यादीत शिंदे यांना उपमुख्यमंत्री पद तसेच नगरविकास खाते आणि त्यांच्या गटाला ६ कॅबिनेट तर ६ राज्यमंत्रीपदं मिळतील असे म्हटले आहे.
भाजपसोबत कोणती आणि किती मंत्रीपदे याबाबत अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही, लवकरच होईल. तोपर्यंत कृपया मंत्रिपदाच्या याद्या आणि याबाबत पसरलेल्या अफवा यावर विश्वास ठेवू नका.
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 30, 2022
यापार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण देणारे ट्विट केले आहे. "भाजपसोबत कोणती आणि किती मंत्रीपदे याबाबत अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही, लवकरच होईल. तोपर्यंत कृपया मंत्रिपदाच्या याद्या आणि याबाबत पसरलेल्या अफवा यावर विश्वास ठेवू नका. वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार, धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण, महाराष्ट्राचा सर्वांगिण विकास आणि आमदारांच्या मतदारसंघातील विकास कामे हाच आमचा फोकस."
असे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे भाजपसोबत एकनाथ शिंदे गट सरकार स्थापन करणार आहे हे देखील निश्चित झाले आहे.