शिंदे फडणवीस यांचे सरकार म्हणजे उधारीचा माल, शिवसेनेची सरकारवर टीका
राज्यात ठाकरे सरकार कोसळल्यानंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवे सरकार स्थापन झाले आहे. मात्र हे सरकार उधारीचा माल असल्याची टीका शिवसेनेने सामनातून केली आहे.;
एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यामुळे ठाकरे सरकार कोसळले. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी सभागृहात केलेल्या भाषणाचा आधार घेत शिंदे(CM Eknath Shinde) आणि फडणवीस (Devendra fadnavis) यांनी केलेली वक्तव्ये म्हणजे उधारीचा माल आहेत, अशी टीका शिवसेनेने (Shivsena) सामनाच्या अग्रलेखातून केली आहे.
सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे की, राज्यात शिंद्यांचे सरकार आले आणि मोदी PM Narendra Modi) यांनी महाराष्ट्राला काहीच कमी पडू देणार नसल्याचे वचन दिले. यावरून दिल्लीचे सरकार राज्यातील मुख्यमंत्री गेल्याशिवाय त्यांना त्यांचे हक्क द्यायचे नाहीत, जणूकाही असं ठरवूनच बसले होते, असा टोला अग्रलेखातून लगावला.
एकनाथ शिंदे यांनी सभागृहात बोलताना 200 जागा जिंकण्याचा दावा केला. त्याचा समाचार घेताना सामनात म्हटले आहे की, फुटीर गटाचे नेते शिंदे यांनी दोनशे जागा जिंकण्याचा वायदा केला आहे. नशीब विरोधकांचे की त्यांनी 288 जागांचा वायदा केला नाही, असा टोला लगावला. तर शिंदे यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्याबरोबर गेलेल्या 50 आमदारांचा पराभव होणार नाही, असं म्हटलं. हा राज्यातील सामान्य जनतेवर दाखवलेला अविश्वास आहे की आमदारांप्रमाणे मतदारही विकत घेता येतात याबाबतचा विश्वास असं म्हणत शिंदे यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.
आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी पळून गेलेल्या आमदारांना पुन्हा कसे निवडून येतात तेच पाहतो, असं आव्हान दिले आहे. या आव्हानात जास्त जोर आहे. मात्र एकनाथ शिंदे यांच्या अंगाला नव्याने हळद लागली आहे. त्यामुळे त्यांचे आत्मविश्वासपर भाषण समजून घेतले पाहिजे, अशी टपली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावली.
पुढे सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे की, एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या भेटीचे सुरस कथन केले. त्यावरून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा उल्लेख दोन नाईट किंग असा केला आहे. तर दोनशे जागा निवडून आणण्याचा वायदा त्यांचा वायदा आहे. त्यामुळे बाजारात नेहमी उधारी चालत असते. तर उधारी म्हणजे आधी माल घ्यायचा आणि नंतर पैसे पण अनेकदा ही उधारी बुडवली जाते. त्यामुळे शिंदे फडणवीस यांची वक्तव्ये म्हणजे उधारीचा माल असल्याची टीका सामनातून केली.
राणे, भुजबळांवरही निशाणा (Samna criticize to Narayan Rane And Chhagan Bhujbal)
एकनाथ शिंदे यांनी केलेले भावनिक भाषण हे बंडाला नैतिक अधिष्ठान प्राप्त होण्यासाठी केले असल्याचे म्हटले. तर अशाच प्रकारे राणे आणि भुजबळ यांनीही संगीत नाटक केले होते, असा टोला नारायण राणे आणि छगन भुजबळ यांनाही लगावला.
यामिनी जाधव, प्रताप सरनाईक, संजय राठोड यांचं काय?
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी यामिनी जाधव (Yamini Jadhav), प्रताप सरनाईक (Pratap sarnaik) आणि संजय राठोड (sanjay rathode) यांच्यावर गंभीर आरोप केले होते. आता त्यांना सोबत घेतल्याने कालपर्यंतच्या संहिता मिठी नदीत फेकून देण्याची वेळ आली. तर चित्रा वाघ यांचे नाव न घेता म्हटले की, भाजपच्या महिला आघाडीच्या नेत्यांना तर या दोघांना धरतीने दुभंगून पोटात घ्यावे, असेच वाटत असेल. याबरोबरच दोन दिवसात तुरूंगात टाकण्याची भाषा कोण करणार असा सवाल करत यांच्या प्रतिमा भाजपने देवघरात पुजेसाठी ठेवल्या व त्यावर हिंदूत्वाचे आणि अन्यायाचे परिमार्जन अशा उदात्त नावाखाली झाले, असा टोला सामनातून लगावला.
तसेच सध्याचे सरकार हे उधारीचा माल आहे. त्यामुळे उधारी चुकवायची कशी? हाच प्रश्न असल्याचे सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे.
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेसाठी संघर्ष केल्याचे सत्य मानू पण त्यांच्यासोबत गेलेल्या 25 आमदारांनी कुठले तुळसीपत्र ठेवले होते? असेही विचारण्यात आले आहे.
तसेच शिंदे-फडणवीस सरकारला काहीही कमी पडू देणार नसल्याचे मोदी सांगतात. ते बुलेट ट्रेन देतील, जीएसटीचा निधी देतील. आरेतील जंगलतोड करू देतील, ईडीच्या चौकशा बंद करतील आणि मुंबईचे तीन तुकडे करतील. यामुळे महाराष्ट्राचे अवसानघात होईल, अशी भीती सामनाच्या अग्रलेखातून व्यक्त केली.