पहाटेच्या शपथविधीवरून एकनाथ शिंदे यांची फटकेबाजी, आमदार पोट धरून हसले
राज्यपालांच्या अभिभाषणावर उत्तर देतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार फटकेबाजी केली.
राज्याचे अर्थसंकल्पिय अधिवेशन सुरु आहे. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर उत्तर देतांना पहाटेच्या शपथविधीवरून अजित पवार (Ajit pawar) यांना चांगलेच टोले लगावले. यावेळी सभागृहात हश्या पिकल्याचे पहायला मिळाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहाटेच्या शपथविधीचा किस्सा सांगताना म्हणाले, अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासोबत शपथ घेतली. त्यावेळी मी झोपेत होतो. पण एक फोन आला आणि टीव्ही चालू करून काय सुरु आहे पहा असं म्हणाले. मी पाहिलं तर मी म्हणलं हे जुनं आहे. पण ते म्हणाले नाही ते आताचं आहे. जरा नीट पाहिलं तर अजित पवार देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शपथ घेत होते. मग जयंत पाटील (Jayant patil) यांना फोन करतोय तर तेही फोन उचलत नव्हते. मग म्हणालो, जयंतराव पण तिथंच आहेत. अनिल देशमुख (Anil Deshmukh) पाठमोरे दिसले मला. तो माझ्यासाठी मोठा शॉक होता. आता त्यासंदर्भातील अनेक गौप्यस्फोट बाकी आहेत. हळूहळू ते केले जात आहेत. ते एकाच वेळी करता येत नाहीत. पण ते सगळे गौप्यस्फोट केले जातील, तेव्हा मोठा शॉक सगळ्यांना बसेल, असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. दुसरीकडे भावी मुख्यमंत्र्यांचे बॅनर लावले जात आहे. एकदा ठरवा नेमकं कुणाला मुख्यमंत्री करायचं आहे, असं म्हणत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी वेळोवेळी अजित पवार, सुप्रिया सुळे (Supriya sule) आणि रोहित पवार (Rohit pawar) यांचे भावी मुख्यमंत्री असे उल्लेख करत बॅनर लावल्याच्या मुद्द्यावर भाष्य करत अजित पवार यांना टोला लगावला.