एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार संकटात सापडले आहे. ४०च्या वर आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्याने शिवसेनेकडे बहुमत देखील उरलेले नसल्याने सरकार अल्पमतात आले आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे राजीनामा देतील अशी चर्चा आहे. पण या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी एक ट्विट करत महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास हा विधानसभा बरखास्तीच्या दिशेने सुरू आहे, असे म्हटले आहे.
पण त्यांच्या या ट्विटला भाजपचे आमदार नितेश राणे यांनी उत्तर दिले आहे. "संजय राऊत यांना संविधान आणि त्यातील तरतुदी कळण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. निवडणुका होणार, असे घाबरवून आमदारांना धमक्या काय देताय? सरकार वाचविण्यासाठी? चिंता नको, महाराष्ट्रात नवे सरकार येणार, विकास पर्व पुन्हा नव्याने सुरू होणार !" असे म्हटले आहे.
दरम्यान राणे यांनीही संजय राऊत यांच्यामुळे ठाकरे सरकार पडल्याची टीका केली आहे. संजय राऊत खुश! कारण त्याला शिवसेनेला सत्तेवरून खाली खेचल्याचा व शिवसेनेला संपवल्याचा आनंद झाला असेल. कपटी, कारस्थानी व दुष्ट बुद्धीच्या माणसाची ही कटकारस्थाने, असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.