पुणे: भोसरी MIDC भूखंड खरेदी प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांना पुन्हा ईडीने समन्स बजावले आहे. त्यांना 18 तारखेला ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे ह्याच प्रकरणात खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना अटक झाली आहे. एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे ह्या आज हजर होणार का ? याकडे आता लक्ष लागून आहे.
भोसरी MIDC भूखंड खरेदी प्रकरण बोगस कंपन्यांकडून कोट्यवधी रुपये व्यवहार झाल्याचा संशय ईडी ला आहे. ह्या खरेदी प्रकरणातच खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना अगोदरच अटक केली आहे. जावयाला अटक केल्यानंतर व्यवहारातील दुसरे भागीदार मंदाकिनी खडसे यांना वारंवार ईडीने समन्स पाठवून हजर राहण्याचे सांगितले असताना मंदाकिनी खडसे ह्या टाळाटाळ करत असल्याने ईडीने पुन्हा नोटीस पाठवत आज म्हणजे 18 तारखेला कागद पत्रांसह हजर राहण्याचं सांगितले आहे.
एकनाथ खडसेंचीही ईडीने अगोदरच चौकशी केली आहे. आता आज मंदाकिनी खडसे ईडी कार्यालयात हजर राहणार का? की पुन्हा ईडी कडे वेळ मागून घेणार? दरम्यान एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे जळगाव जिल्हा बँकेच्या चेअरमन असलेल्या बँकेला ही ईडीने नोटीस पाठवली आहे. मुक्ताई साखर कारखाना कर्ज प्रकरणी ईडीला कर्ज प्रकरणातील कागदपत्र तपासायची आहेत. आवश्यक ती कागदपत्र ईडी कार्यालयात सादर करण्याची नोटीसही जिल्हा बँकेला दिले आहेत.