सध्या देशात धार्मिक तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यावरून चिंतेचे वातावरण आहे. त्यापार्श्वभुमीवर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी देशाचे तुकडे करणे हा भाजपचा अजेंडा असल्याची टीका केली आहे.
राज ठाकरे यांच्या औरंगाबाद येथील सभेची राज्यात जोरदार चर्चा सुरू आहे. त्यातच औरंगाबाद येथे वंचित बहुजन आघाडीच्या सद्भावना रॅलीला पोलिसांनी परवानगी नाकारली. तर वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांची पोलिसांनी धरपकड केली. त्याबद्दल प्रकाश आंबेडकर यांनी मॅक्स महाराष्ट्रला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत संताप व्यक्त केला.
राज ठाकरे यांच्या भुमिकेमुळे राज्यात वातावरण तापले आहे. त्यातच आज औरंगाबाद येथे राज ठाकरे यांची सभा होणार आहे. त्यापार्श्वभुमीवर वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून काढण्यात येणाऱ्या रॅलीला पोलिसांनी परवानगी नाकारली. तर वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांची धरपकड केली. त्याबद्दल प्रकाश आंबेडकर यांनी संताप व्यक्त केला.
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, कोणी कुठे सभा घ्यावी, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मात्र औरंगाबाद हे संवेदनशील शहर आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्या सभेतून धार्मिक तणाव निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे राज ठाकरे यांच्या सभेला औरंगाबाद येथे परवानगी नाकारण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीने केली होती. मात्र पोलिसांनी राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी दिली आहे. त्यामुळे औरंगाबादमध्ये दंगल व्हावी अशी राज्य सरकारचीच इच्छा असल्याचा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला.
औरंगाबाद हे संवेदनशील शहर आहे. त्यामुळे हिजाब प्रकरणी झुंडीला निर्भीडपणे सामोरी गेलेल्या मुस्कानच्या सत्काराला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. मग त्याच शहरात धार्मिक तणाव निर्माण होण्याची शक्यता असताना राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी दिली जात असल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले.
तसेच राज ठाकरे यांच्या सभेला RSS, भाजप आणि त्यांच्या पिलावळींचा पाठींबा असल्याचेही यावेळी म्हणाले. त्यामुळे देशात धार्मिक दुहीची बीजं पेरून देशाचे तुकडे करणे हा भाजपचा अजेंडा असल्याचे प्रकाश आंबेडकर यावेळी म्हणाले. देशात विरोधी पक्ष शिल्लक राहिला नाही. मात्र वंचित बहुजन आघाडीला संधी दिली तर आम्ही सक्षम असा राजकीय पर्याय देऊ, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.