जळगाव, सांगली नंतर धुळे महापालिकेची सत्ता भाजप च्या हातून जाण्याची भीती...

Update: 2021-09-14 08:56 GMT

संतोष सोनवणे: जळगाव आणि सांगली महापालिकेत स्पष्ट बहुमत असतांनाही भाजपला सत्ता गमवावी लागली होती. आता धुळे महापालिकेतही महाविकास आघाडी करेक्ट कार्यक्रम करण्याची भीती भाजप ला असल्याने भाजप 'ताक ही फुंकून पीत' असल्याने धुळे महापालिकेतील भाजप चे नगरसेवक अज्ञात स्थळी रवाना करण्यात आली आहेत. धुळे महापालिका नव्या महापौरांची 17 सप्टेंबर ला निवड होणार आहे. ही निवडणूक चार दिवसांवर येऊन ठेपल्याने राजकीय वर्तुळात गतिमान हालचाली सुरू झाल्या आहेत.

2018 मध्ये धुळे महापालिका निवडणुकीत 74 जागांपैकी 50 जागांवर भाजपने निर्विवाद बहुमत मिळवत सत्ता मिळवली आहे. आता महापौर पदासाठी अडीच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने भाजप मधीलच अडीच वर्षासाठी नवा महापौर निवडीसाठी रस्सीखेच सुरू आहे. पहिल्या टर्म साठी भाजपचे जेष्ठ नगरसेवक चंद्रकांत सोनार यांच्या गळ्यात माळ पडली होती. आता दुसऱ्या टर्म साठी पक्षांतर्गत गट समोर आले आहेत. इच्छुकांची संख्या वाढली आहे. यात प्रतिभा चौधरी,वालीबेन मांडोरे, प्रदीप कर्पे, संजय पाटील यांची नावे चर्चेत आहेत. माजी स्थायी समिती सभापतींनी ही ह्या निवडणुकीत रस घेतला आहे.

भाजपचे संख्याबळ पाहता पक्षातच महापौर बसेल मात्र, सांगली जळगाव महापालिकेतील भाजपचे स्पष्ट बहुमत असतानाही सत्तांतरण करून महाविकास आघाडीने करेक्ट कार्यक्रम केला होता. जळगाव मध्ये 57 नगरसेवक असूनही भाजप च्या नाराज 27 नगरसेवकांचा एक गट फुटून शिवसेनेला जाऊन मिळाला आणि शिवसेनेचा महापौर झाला.

शिवसेनेचे अल्पमतात असूनही सत्ता मिळवली होती. तेच सांगली मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येऊन भाजपची सत्ता उलथून टाकली होती. तशीत परिस्थिती धुळे महापालिकेमध्ये होऊ शकते. त्यामुळे भाजप ने आपले नगरसेवकांची सहल गुजरात राज्याच्या दमण येथे पाठवल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

महापौर पदासाठी भाजप कडून प्रतिभा चौधरी, प्रदीप कर्पे, संजय पाटील यांनी अर्ज केले आहेत. तर मदिना पिंजारी यांनी काँग्रेस कडून, अन्सारी गणी यांनी एमआयएम कडून तर मोशीन इस्माईल यांनी अपक्ष म्हणून महापौर पदासाठी अर्ज दाखल केले आहेत.

Tags:    

Similar News