नगर पंचायत निवडणूकीच्या निमित्ताने बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा मुंडे विरुद्ध मुंडे संघर्ष तापू लागला आहे. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे पुन्हा एकदा एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. येत्या 21 डिसेंबर रोजी नगरपंचायत निवडणुकीसाठी मतदान होणार आहे आणि याचीच रणधुमाळी सध्या सुरू आहे. या निवडणुकीमध्ये बीड जिल्ह्यात अनेक दिग्गजांच्या प्रतिष्ठा पणाला लागली आहे. याच पार्श्वभूमीवर भाऊ धनंजय मुंडे आणि बहीण पंकजा मुंडे या दोघांमध्ये सामना रंगला आहे. पाच वर्ष सत्तेत असताना तुम्ही ऊसतोड महामंडळासाठी काय केलं, असा सवाल धनंजय मुंडे यांनी उपस्थित केलाय. तर दुसरीकडे आष्टी येथे झालेल्या सभेमध्ये पंकजा मुंडे यांनी जिल्ह्यातील शेतकरी नुकसान भरपाई आणि पीक विम्यापासून वंचित असल्याचं म्हणत धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली आहे.