राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. तर शिवसेनेने सहाव्या जागेसाठी उमेदवार दिल्यामुळे संभाजी राजे समर्थक आक्रमक झाले आहेत. त्यापार्श्वभुमीवर विरोधी पक्षनेते असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे.
राज्यात राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी संभाजी राजे यांनी अपक्ष लढण्याची घोषणा केली. तसेच सर्व पक्षांनी त्यांच्या उमेदवारीला पाठींबा द्यावा, अशी मागणी केली होती. मात्र शिवबंधन बांधल्याशिवाय संभाजी राजे यांना पाठींबा देणार नसल्याचे स्पष्ट केले. त्यातच संभाजी राजे यांनी शिवसेनेत प्रवेश करणार नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर अखेर शिवसेनेने कोल्हापुरच्या संजय पवार यांना राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी उमेदवारी जाहीर केली. त्यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, संभाजी राजे यांनी अपक्ष निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केल्यानंतर त्यांना शरद पवार यांनी पाठींबा देऊन या प्रकरणाची सुरूवात केली. मात्र त्यानंतर शिवसेनेने अटी शर्ती घालत संभाजी राजेंचा अपमान केला. तसेच संजय पवार यांना उमेदवारी देत शिवसेनेने संभाजी राजे यांची कोंडी केल्याचे चित्र आहे. मात्र हा त्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे. त्यावर मी काही बोलणार नाही, असेही फडणवीस यावेळी म्हणाले.
फडणवीस यांनी महागाईच्या मुद्द्यावरून शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. तर केंद्र सरकारचा 19 रुपये कर आणि राज्य सरकारचा 29 रुपये पेट्रोलवर कर असताना हे केंद्र सरकारच्या विरोधात महागाईवरून आंदोलन करत आहेत. सर्वात जास्त कर लावूनही ते महागाईवरून आंदोलन कसे करू शकतात, याचेच आश्चर्य वाटत असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले.