दिल्लीः उपराज्यपाल अनिल बैजल यांचा राजीनामा, कोण असतील पुढील राज्यपाल?
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपराज्यपाल अनिल बैजल यांच्यामध्ये अनेकवेळा वाद झाले होते.
दिल्लीचे उपराज्यपाल अनिल बैजल यांनी राजीनामा दिला आहे. त्यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविद यांना लिहिलेल्या राजीनाम्यात आपण आपल्या वैयक्तिक कारणास्तव राजीनामा देत असल्याचं म्हटलं आहे. अनिल बैजल यांच्या अगोदर दिल्लीच्या उपराज्यपाल पदाची जबाबदारी नजीब जंग यांच्यावर होती.
अनिल बैजल आणि दिल्लीच्या अरविंद केजरीवाल सरकारमध्ये अनेक वेळा वाद झाले होते. केजरीवाल सरकारने अनिल बैजल यांच्यावर काम न करून देण्यासह केंद्र सरकारचे एजंट असल्याचा गंभीर आरोप केला होता. कोरोना काळात हा वाद आणखी वाढला होता. उपराज्यपाल अनिल बैजल यांनी केजरीवाल सरकारला न सांगता अधिकाऱ्यांची एक बैठक बोलावली होती. त्यानंतर केजरीवाल यांनी या बैठकीवर जाहीर नाराजी व्यक्त केली होती. अनिल बैजल यांनी ३१ डिसेंबर २०१६ ला दिल्लीच्या उपराज्यपाल पदाचा कार्यभार स्वीकारला होता. त्यांच्या राजीनाम्यानंतर दिल्लीच्या उपराज्यपाल पदाची जबाबदारी कोणाकडे दिली जाते हे पाहणे महत्त्वाचे आहे.