देगलूर बिलोली पोटनिवडणुकीसाठी मतमोजणीला सुरुवात; काँग्रेस की भाजप,कोण मारणार बाजी
राज्याचे लक्ष लागलेल्या नांदेडमधील देगलूर बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीसाठी झालेल्या मतदानानंतर आज मतमोजणी होत आहे. सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली असून, एकूण 14 टेबलवर 30 फेऱ्यांची ही मतमोजणी होईल. या निवडणुकीत 64.95 % इतकं मतदान झालंय. त्यामुळे देगलूरचा पुढचा आमदार कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असून, दुपारी 12 ते 1 च्या दरम्यान, चित्र स्पष्ट होईल.
काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनानंतर देगलूरमध्ये पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीत एकूण 12 उमेदवार रिंगणात होते. पण प्रत्यक्षात 2 पक्षात प्रामुख्याने ही लढत होत आहे. त्यामुळे भाजप की काँग्रेस या दोन्ही पैकी देगलूरमध्ये कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अनुसुचित जातीसाठी आरक्षित असणाऱ्या या मतदारसंघात काँग्रेसकडून जितेश अंतापूरकर, भाजपचे उमेदवार सुभाष साबणे यांच्यासह इतर उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
विशेष म्हणजे, या निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या जिल्ह्यातील ही निवडणूक असून, गेल्या महिन्याभरापासून मंत्री अशोक चव्हाण देगलूर बिलोलीमध्ये तळ ठोकून होते. तर भाजपकडून अनेक मोठ्या नेत्यांनी देगलूरमध्ये जाऊन प्रचार केला तर अनेक विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक महत्वाच्या नेत्याच्या सभा सुद्धा झाल्या. त्यामुळे काही तासात देगलूर पोटनिवडणूकीचं चित्र स्पष्ट होणार असून, कोण बाजी मारणार हे पाहणे महत्वाचे ठरेल.