राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर आता खातेवाटपाबाबत चर्चा सुरू आहे. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. खातेवाटप लवकरच जाहीर होईल पण माध्यमांमध्ये जे खातेवाटप आले आहे, ते चुकीचे आहे असा दावाही त्यांनी केला आहे. शिवसेनेने त्यावेळी आमच्या पाठीत खंजीर खुपसला, त्यामुळे खरी शिवसेना आज आमच्या बरोबर आली असेही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी म्हटले आहे. नितीश कुमार यांच्या निर्णयावर प्रतिक्रिया देतांना भाजप मित्रपक्षांना कधीही धोका देत नाही, असा दावा त्यांनी केला आहे.
त्याचबरोबर शऱद पवार यांच्या टीकेला उत्तर देताना फडणवीस यांनी, पवार साहेबांचं दु: ख जरा वेगळं आहे, ते आपणा सर्वांना माहित आहे, असा टोला लगावला. तसेच ज्यावेळी शरद पवार यांनी पक्ष बदलला, त्यावेळी पक्षांतर बंदीचे कायदे नव्हते त्यामुळे कोणालाही कसंही बदलता यायचं, पण आता शिवसेना शिंदे साहेबांच्या रुपाने कायदेशीर लढाई करत आहे, असेही फडणवीस यांनी सांगितले आहे.