पक्षात कमी डोक्याचे लोक असतात, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जाहिरातबाजीवर देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य
एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा जास्त पॉप्युलर असल्याची जाहिरात शिवसेनेकडून प्रसिध्द करण्यात आली होती. त्यावर पहिल्यांचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यापेक्षा जास्त पॉप्युलर असल्याची जाहिरात (Advertisement) शिवसेनेने प्रसिध्द केली होती. त्यावरून राज्यात वाद निर्माण झाला होता. तर देवेंद्र फडणवीस हेसुद्धा एकनाथ शिंदे यांच्यावर नाराज असल्याची चर्चा रंगली होती. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारमध्ये (Shinde Fadnavis Government) सगळं काही आलबेल नसल्याचे म्हटले जात होते. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना दुसरी जाहिरात प्रसिद्ध करावी लागली होती. त्यावर प्रथमच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, एकनाथ शिंदे आणि माझ्यात कोणतीही स्पर्धा नाही. कारण जाहिरात प्रसिध्द झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला सांगितले होते की, जाहिरात चुकीची प्रसिद्ध झाली. त्यामुळे आम्ही दोघंही आमचा समजूतदारपणा सोडत नाही. मी त्यांचा सन्मान मोडत नाही आणि ते मला उपमुख्यमंत्री असल्याचे भासू देत नाहीत, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, पक्षात काही कमी डोक्याचे लोक असतात. ते कमी डोक्याचे लोक चूका करतात. याचा अर्थ सरकार पडणार, असं कुणाला वाटत असेल तर ते घडणार नाही. कारण आमचं सरकार हे खुर्च्या तोडण्यासाठी बनलेलं नाही, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी युवक काँग्रेसच्या (Congress) बैठकीत झालेल्या खुर्च्यांच्या तोडफोडीवर भाष्य केले.