कोथरुडला विजय मिळविताना चंद्रकांत पाटील यांच्या तोंडाला फेसच आला होता-सामना
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री हसन मुश्रीम यांना उद्देशून "'ईडी'शी लढताना तोंडाला फेस येईल" या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचा शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून चांगलाच समाचार घेण्यात आला आहे.
पाटील यांना 'ईडी'चा इतका अनुभव कधीपासून आला?, विधानसभा निवडणुकीत कोल्हापुरात भाजपचा सुपडा साफ झाला व चंद्रकांत पाटील यांना कोल्हापुरातून पळ काढून कोथरुडला जाऊन निवडणूक लढवावी लागली असं म्हणत कोथरुडला विजय मिळविताना चंद्रकांत पाटील यांच्याही तोंडाला तसा फेसच फेस आला होता, असा टोला सामनाच्या अग्रलेखातून पाटील यांना लगावण्यात आला आहे.
सोबतच हा प्रश्न चंद्रकांत पाटील यांच्या धमकीचा नसून, केंद्रीय तपास यंत्रणांच्या राजकीय गैरवापराचा आहे. 'ईडी'शी लढताना तोंडाला फेस येईल, असे चंद्रकांत पाटलांनी सांगणे हा अहंकार आहे." केंद्रात आमची सत्ता आहे, आम्ही काहीही करू शकतो," अशी भाषा पाटील यांनी याआधीही अनेकदा केली आहे." महाराष्ट्राच्या परंपरेला हा अहंकार शोभणारा नाही असं सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे.