मानहानीच्या दाव्यात किरीट सोमय्यांना जामीन पण...

Update: 2021-10-06 08:24 GMT

महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांवर आणि नेत्यांवर गंभीर आरोप करुन खळबळ उडवून देणाऱ्या भाजप नेते किरीट सोमय्या यांना एक धक्का बसला आहे. सोमय्या यांनी खोटे आरोप केल्याचा दावा करत त्यांच्याविरोधात NGO अर्थ आणि प्रवीण कलमे यांनी मानहानीचे दावे दाखल केले होते. किरीट सोमय्या यांना मानहानीच्या या दोन्ही प्रकरणात शिवडी कोर्टाने वैयक्तिक १५ हजारांच्या हमीवर जामीन मंजूर केला आहे. पण सोमय्या यांना काही अटींवर जामीन देण्यात आल्याची माहिती याचिकाकर्ते प्रवीण कलमे यांनी दिली आहे. यामध्ये सोमय्या यांना हा खटला सुरू असेपर्यंत कोर्टाच्या परवानगीशिवाय बाहेर जाता येणार नाही, असे सांगितले आहे. आता याप्रकरणी पुढील सुनावणी २५ नोव्हेंबरला होणार आहे.

किरीट सोमय्या यांनी 'ट्विटर'वर बदनामी करणारे ट्विट केल्याने नाहक त्रास झाल्याचा आरोप करत 'अर्थ' NGO आणि प्रवीण कलमे यांनी कोर्टात मानहानीचे दावे केले आहेत. यानंतर कोर्टाने सोमय्या यांना समन्स बजावले होते. त्यानंतर मंगळवारी झालेल्या सुनावणीला सोमय्या हजर झाले होते. तसेच आपण दोषी नसल्याचा दावाही त्यांनी केला. यानंतर कोर्टाने त्यांना या दोन्ही खटल्यात प्रत्येकी १५ हजार रुपयांच्या वैयक्तिक हमीवर जामीन मंजूर केला.

किरीट सोमय्या यांनी १ एप्रिल रोजी ट्विट करत प्रवीण कलमे हे गृहनिर्माण खात्यामधील सचिन वाझे असून जितेंद्र आव्हाड यांचे एजंट आहेत, असा आरोप केला होता. 


Tags:    

Similar News