गुजरात दंगल प्रकरणात तत्कालीन मुख्यमंत्री मोदींना अडचणीत आणण्यासाठी काँग्रेसचे दिवंगत नेते अहमद पटेल यांनी तीस्ता सेटलवाड यांना मदत केली, असा गंभीर आरोप SITने केला आहे. तसा अहवाल कोर्टात सादर करण्यात आला आहे. पण अहमद पटेल हे केवळ प्यादे होते आणि सोनिया गांधी यांनीच हा कट रचला होता, असा आरोप भाजपने केला आहे, तीस्ता सेटलवाड यांना ३० लाख रुपयांचा पहिला हप्ता देण्यात आला होता, पण नंतर त्यांना कोट्यवधी रुपये दिले गेले असतील असा आरोप भाजपचे प्रवक्ते सांबित पात्रा यांनी केला आहे.
पण भाजपच्या या आरोपाला काँग्रेसने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. दरवेळी गुजरातच्या निवडणुका आल्या की भाजप आणि मोदी मुस्लिमांना टार्गेट करतात, असा आरोप काँग्रेसने केला आहे. तसेच मोदी सरकारने कामं केली असतील तर त्याच्या आधारावर मतं का मागत नाही, दरवेळी भाजपला षडयंत्रांची गरज का पडते, असा सवालही काँग्रेसने उपस्थित केला आहे.