...तर काँग्रेस घालणार अदानींना हार, मल्लिकार्जून खर्गे यांनी राज्यसभेत केलं जाहीर

राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जून खर्गे यांनी अदानी प्रकरणावर संयुक्त संसदीय समितीची मागणी केली.;

Update: 2023-02-09 02:50 GMT

संसदेच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनात विरोधी पक्षांनी अदानी प्रकरणावरून संयुक्त संसदीय समितीची (JPC) मागणी केली. याबरोबरच खर्गे यांनी सरकारवर टीकास्र सोडले.

गेल्या काही दिवसांपुर्वी हिंडेनबर्गने (Hindenberg) प्रसिध्द केलेल्या अहवालात अदानी समुहावर गंभीर आरोप करण्यात आले होते. त्यावरून विरोधी पक्षांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. त्यातच राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जून खर्गे (Mallikarjun kharge) यांनी अदानी समुहाच्या कथित घोटाळ्याची (Adani group scam) संयक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करण्याची मागणी केली.

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेत खर्गे यांनी पंतप्रधान मोदी (PM Modi) यांच्यासमोर अदानी समुहाच्या कथित गैरव्यवहाराची तसेच अदानींची संपत्ती 50 हजार कोटींवरून 3 लाख कोटींवर कशी गेली? याची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करण्याची मागणी केली. मात्र यावेळी भाजपने राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचे मेहुणे रॉबर्ट वॉड्रा (Robbert Vadra) यांचा मुद्दा उपस्थित करून खर्गेंना प्रत्युत्तर दिले. मात्र खर्गे पुढे म्हणाले, गुजरातमधील शेतकऱ्याला 31 पैसे थकबाकी राहिल्याने ना हरकत प्रमाणपत्र मिळाले नाही. मात्र दुसरीकडे या इसमाला 82हजार कोटींचे कर्ज दिले. यावर राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड (Jagdeep Dhankhar) यांनी आक्षेप घेतला. तसेच उपराष्ट्रपती धनखड यांनी खर्गे यांना पुरावे सादर करण्यास सांगितले. त्यावर भाजप खासदारांनी बाक वाजवले. त्यानंतर खर्गे म्हणाले, मी खरं बोललो तर मी देशविरोधी. पण जर अदानी हरीश्चंद्रासारखे शुध्द निघाले तर त्यांना काँग्रेस हार घालेल, असं मत राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जून खर्गे यांनी व्यक्त केले.

Tags:    

Similar News