आमदार प्रणिती शिंदेंच्या नेतृत्वात स्वातंत्र्यदिनी काँग्रेसचा 'मशाल लॉंगमार्च'
सोलापूर : भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या 75 व्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त सोलापुरात काँग्रेसकडून 'व्यर्थ ना हो बलिदान' हे अभियान राबविले जातं आहे. यानिमित्ताने आमदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वात महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन करून काँग्रेस भवन पर्यंत 'मशाल लॉंग मार्च' काढण्यात आला, त्यानंतर भारतीय ध्वजास अभिवादन करून स्वातंत्र्यादिन साजरा करण्यात आला. यावेळी सूत कापण्याचा कार्यक्रम ही आयोजित करण्यात आला होते.
कोरोना नियमांचे पालन करत काँग्रेस कार्यकर्त्यांनी उस्फुर्तपणे आपला सहभाग या अभियानामध्ये नोंदवल्याचं पहायला मिळलं. यावेळी बोलताना आमदार शिंदे म्हणाल्या की, 75 व्या वर्षात पदार्पण करत असताना या देशाला युवकांची गरज आहे, देशाला अखंड ठेवण्याची गरज आहे.75 व्या वर्षात आपण पाऊल ठेवत असताना देशातील युवकांच्या मनात सर्वधर्म समभावची भावना रुजायला हवी. 75 वर्षांपूर्वी अनेकांना देशासाठी आपले बलिदान दिले आणि देशाला लोकशाही मिळवून दिली, तीच भावना आताच्या युवकांमध्ये निर्माण व्हायला हवी देशाच्या लोकशाहीला जर बाधा निर्माण होत असेल तर युवकांनी एकत्र येत त्याचा मुकाबला करण्याची ही वेळ असल्याची भावना आमदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली.