आम्हाला मारून टाका, गाडून टाका पण शेतकऱ्यांचा मुद्दा लावून धरणारच- राहुल गांधी
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील लखीमपूरला जात असताना काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांना ताब्यात घेतल्यावरून वरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. आम्हाला मारून टाका, गाडून टाका, त्याने काही फरक पडत नाही. आमची ट्रेनिंग अशीच आहे. मुद्दा शेतकऱ्यांचा आहे. आम्ही त्यावर बोलतच राहणार, असं राहुल गांधी यांनी स्पष्ट केलं.
सोबतच काँग्रेस नेते राहुल गांधी आज लखीमपूरला जाणार आहेत. पण, त्यांना उत्तर प्रदेशातील योगी सरकारने परवानगी नाकारली आहे. त्यामुळे राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली, आपल्या देशात शेतकऱ्यांवर हल्ला होत आहे. त्यांना जीपखाली चिरडले जात आहे. तरी मंत्र्यांवर कारवाई होत नाही. शेतकऱ्यांकडून त्यांच्या जमिनी घेतल्या जातात, तीन कृषी कायदे बनविण्यात आले. त्यामुळेच शेतकरी आंदोलन करत आहेत. शेतकऱ्यांमध्ये यावरून तीव्र आक्रोश आहे, असं राहुल म्हणाले.
दरम्यान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी लखनऊमध्ये होते. मात्र, त्यांना लखीमपूरला जावसं वाटलं नाही, अशी टीका राहुल गांधी यांनी केली, सोबतच मी आज लखीमपूरला जाण्याचा प्रयत्न करणार आहे. आम्ही तीनजण लखीमपूरला जाणार आहोत. कलम 144 लागू करण्यात आल्याने पाच लोक जाऊ शकत नाही. त्यामुळे आम्ही तिघेच जाणार आहोत. आम्ही प्रशासनाला तसे पत्रंही दिलं आहे, असं त्यांनी सांगितलं.