राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली 7 सप्टेंबरपासून काँग्रेसची भारत जोडो यात्रा निघत आहे. कॉंग्रेसची ही भारत जोडो यात्रा कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत असणार आहे. त्यात महाराष्ट्रातील नांदेड आणि जळगाव या दोन ठिकाणी राहुल गांधी यांच्या जाहीर सभा होणार आहेत. मात्र, राहुल गांधी यांची ही भारत जोडो यात्रा पक्ष अत्यंत कठीण कालावधीतून जात असताना निघत असल्यानं राहुल गांधी यांची ही यात्रा कॉंग्रेसला पुन्हा उभारी देणार का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो.
2014 च्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर काँग्रेस कोमात गेली आहे. कॉंग्रेसचे अनेक महत्त्वाचे नेते पक्ष सोडून गेले आहेत... काही पक्ष सोडण्याच्या रांगेत आहेत. काँग्रेस अध्यक्षपदाचा प्रश्न प्रलंबित आहे. राहुल गांधी स्वत: तीन वर्षापासून कॉंग्रेसचं अध्यक्ष नाकारत आले आहेत.
नॅशनल हेराल्डच्या कथित प्रकरणात केंद्रीय यंत्रणांनी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची चौकशी केली तेव्हाच पक्षात जरासा पुन्हा जीव आल्याचं चित्र निर्माण झाल्याचं दिसून आलं. मात्र, गांधी घरातील व्यक्तींसाठी पक्षाने ज्या पद्धतीने आंदोलन केले. त्या पद्धतीने पक्षाने जर जनतेच्या समस्यांसाठी आंदोलन केलं तर पक्ष उभा राहू शकतो. याची जाणीव कदाचित कॉंग्रेस नेतृत्त्वाला झाल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे.
कॉंग्रेसची ही भारत जोडो यात्रा हा केवळ काँग्रेस पक्षाला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न नसून राहुल गांधी यांची देखील जनमानसात प्रतिमा निर्माण करण्याचं काम आहे. हे विसरुन चालणार नाही. त्यामुळं राहुल गांधी यांच्या सोबतच कॉंग्रेसला देखील या भारत जोडो यात्रेतून काय मिळतं हे पाहणं महत्त्वाचं आहे.
किती दिवस चालणार यात्रा...
काँग्रेसची ही यात्रा 7 सप्टेंबरपासून सुरू होणार असून 150 दिवसांत ही यात्रा 12 राज्यांतून जाणार आहे. या यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी प्रभावीपणे मुद्दे मांडले. आपल्या विचारांचा प्रभाव आणि प्रचार जनतेपर्यंत घेऊन जाण्यास ते यशस्वी ठरले तरच या यात्रेतून कॉग्रेस पक्षाला काही तरी मिळेल.
देशातील एक मोठा वर्ग भाजप आणि आरएसएसच्या नवीन राजकारणाच्या विरोधात आहे. खास करून मोदी आणि शहा यांच्या वेगळ्या पद्धतीच्या राजकारणापासून अलिप्त राहण्याची अनेक राजकारण्यांची इच्छा आहे. अनेक तज्ज्ञ लोक मोदी आणि अमित शहा यांच्या नवीन राजकीय पद्धतीच्या विरोधात आहेत. मात्र, राहुल गांधी या लोकांच्या आक्रोशाला कशी वाचा फोडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. लोकांच्या हातचं काम गेलं आहे. मोठ्या प्रमाणात महागाई आणि बेरोजगारांची समस्या आपल्या समोर पाहायला मिळते. त्यामुळं यासारख्या मुद्यांवर राहुल गांधी कसा फोकस करतात हे पाहणं महत्त्वाचं आहे.
कॉंग्रेसच्या भारत जोडो यात्रेचं वैशिष्ट काय?
कॉंग्रेसला पुन्हा एकदा उभं करण्यासाठी केलेला हा आत्तापर्यंतचा सर्वात मोठा प्रयत्न आहे. कॉंग्रेसचा राष्ट्रीय स्तरावरील हा हा पहिलाच जनसंपर्क कार्यक्रम आहे. सहसा काँग्रेसचे मोठे नेते मोठमोठ्या रॅलींना संबोधित करतात किंवा रोड शो करतात. काँग्रेस असा जनसंपर्क कार्यक्रम क्वचितच करते.