काँग्रेसमध्ये भुकंप, बाळासाहेब थोरात यांचा विधीमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा
पदवीधर आणि शिक्षक (Teacher and Graduate Election) निवडणूकीत सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांनी अपक्ष अर्ज दाखल केल्यापासून काँग्रेसमध्ये खदखद सुरु होती. त्यातच नाना पटोले यांनी तांबे यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर सत्यजित तांबे यांनी नाना पटोले यांच्याबाबत अनेक गौप्यस्फोट केले. त्यापाठोपाठ बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनीही आपल्याबाबत राजकारण झाल्याचे म्हटले होते. त्यानंतर बाळासाहेब थोरात यांनी थेट विधीमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला आहे.
काँग्रेसमध्ये गेल्या काही दिवसांपासून अंतर्गत गटबाजी सुरु आहे. ही गटबाजी आज बाळासाहेब थोरात यांच्या काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनाम्याने उफाळून आली. थोरात यांनी हा राजीनामा दिल्ली हायकमांडकडे पाठविला असल्याचे सांगितले आहे. हा राजीनामा पाठवताना थोरात यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana patole) यांना टार्गेट केले आहे. आता याप्रकरणी काँग्रेस हायकमांड कोणता निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
आज काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांचा वाढदिवस आहे, आणि आजच्याच दिवशी थोरात यांनी विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले की, बाळासाहेब थोरात यांनी असो कोणताही राजीनामा दिल्याची माहिती आम्हाला मिळालेली नाही. त्यांनी राजीनामा दिला नसल्याची माहिती नाना पटोले यांनी नागपूर येथे पत्रकारांशी संवाद साधताना दिली.
बाळासाहेब थोरात यांनी राजीनामा दिल्याचे पत्र जर मिडीयाला प्राप्त झाले असेल तर ते मला सुद्धा दाखवण्यात यावे, अशी मागणी नाना पटोले यांनी पत्रकारांना यावेळी केली. बाळासाहेब थोरात यांची तब्बेत चांगली नसल्यामुळे ते कोणाशी बोलत नसल्याचे पटोले यांनी यावेळी सांगितले. तसेच हे काँग्रेसच्या विरोधात राजकारण सुरु असल्याचे पटोले यांनी सांगत, राज्यात काँग्रेसला यश मिळत आहे, त्याचा विरोधकांना त्रास होत असल्यामुळे विरोधकांनी बहुतेक करुन हे षडयंत्र रचले असावे, अशी शंका सुद्धा नाना पटोले यांनी यावेळी व्यक्त केली. त्यामुळे आता यामध्ये नेमके कोण खरं बोलतयं आणि कोण खोट...हे बाळासाहेब थोरात जेव्हापर्यत याप्रकरणी काही बोलत नाही, तोपर्यत हा सस्पेन्स कायम राहणार आहे.