२ कोटी नोकऱ्यांच्या आश्वासनांचं काय झालं? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना सवाल…
शनिवारी केंद्र सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत देशभर रोजगार मेळावा घेतला. या मेळाव्यात मोंदींच्या हस्ते तसेच विविध राज्यांतील मंत्र्यांच्या हस्ते देशभरातील ७५ हजार तरूणांना थेट नियुक्ती पत्रच देण्यात आली. या रोजगार मेळाव्यावर आता काँग्रेस ने टीका केली आहे. घोषणा केलेल्या १६ कोटी रोजगारांचं काय झालं? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
केंद्र सरकारच्या या उपक्रमानंतर काँग्रेसने सवाल उपस्थित केले नसते तर नवल वाटलं असतं. काँग्रेसचे सरचिटणीस रणदीप सुरजेवाला य़ांनी ट्विटरवर एक व्हिडीओ पोस्ट करत घोषणा केलेल्या १६ कोटी रोजगारांचं काय झालं? असा सवालच विचारला आहे. ते म्हणाले आहेत, पंतप्रधान मोदींनी सत्तेवर येताच दरवर्षी २ कोटी नोकऱ्या देऊ अशी घोषणा केली होती. पण केंद्रात भाजपची सत्ता येऊन आज ८ वर्षे झाली असताना सरकार रोजगार मेळावे घेऊन केवळ ७५ हजार तरूणांना नियुक्ती पत्र देत आहे. मग घोषीत केलेल्या १६ कोटी रोजगारांचं काय झालं? असा प्रश्न काँग्रेसनं उपस्थित केला आहे. भारत जोडो यात्र चार राज्यांमधून जाताच केंद्र सरकारला रोजगारांची आठवण झाली आणि तशी कबूलीच या रोजगार मेळाव्यात दिली. बेरोजगारी हा देशातील सर्वात मोठा प्रश्न असल्याचे जुमला किंगला आमच्यामुळे मान्य करावेच लागले. भारत जोडो यात्रेचे हे सर्वात मोठं यश आहे.
मात्र कोणताही इव्हेंट करून हा प्रश्न मार्गी लागणार नाही. विविध सरकारी विभागातील जवळपास ३० लाख जागा रिक्त आहेत त्या कधी भरल्या जाणार आहेत? या प्रश्नाचं उत्तर पंतप्रधानांनी तरूणांना द्यायला हवं असं देखील काँग्रेसने म्हटलं आहे. ७५ हजार नोकऱ्या देऊन हा प्रश्न सुटणार नाही त्यामुळे भारत जोडो यात्रेच्या माध्यमातुन राहुल गांधी आणि काँग्रेस विचारत राहणार आहे. असं देखील ते म्हणाले आहेत.