विधान परिषद निवडणूक : महाविकास आघाडीचा करेक्ट कार्यक्रम, फडणवीस यांचा धक्का

Update: 2022-06-20 17:24 GMT

अत्यंत चुरशीच्या झालेल्या विधान परिषद निवडणुकीत पुन्हा एकदा महाविकास आघाडीला धक्का देण्यात देवेंद्र फडणवीस यशस्वी ठरले आहेत. भाजपने प्रसाद लाड यांच्या रुपाने पाचवा उमेदवार दिला होता. लाड यांचा विजय अशक्य असल्याचा दावा महाविकास आघाडीने केला होत, पण महाविकासा आघाडीची मतं फुटल्याची चर्चा आहे. भाजपचे पाचवे उमेदवार प्रसाद लाड यांना पहिल्या पसंतीची जास्त मतं मिळाल्याने काँग्रेसला धक्का बसला आहे. धक्कादायक बाब म्हणजे काँग्रेसचे पहिल्या पसंतीचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला आहे. तर भाई जगताप यांचा विजय झाला आहे. "काँग्रेसला या निवडणुकीत सगळ्यात मोठा धक्का बसला आहे, काँग्रेसचीच मतं फुटली" अशी कबुली पक्षाचे ज्येष्ठे नेते बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. एबीपी माझाशी बोलताना थोरात यांनी पक्षांतर्गत गटबाजीतून काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव झाल्याचे सांगितले आहे. तसेच यासाठी आपण नेते म्हणून जबाबदारी स्वीकारत असल्याचेही त्यांनी सांगितले. "सरकार म्हणून विचार करावा लागेल, आमचीही मतं फुटली, एकत्र म्हणून सरकार चालवतो पण कुठे तरी चुकत आहे" असे वक्तव्य बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस नाराज असल्याचे दिसते आहे. तर दुसरीकडे चंद्रकांत हंडोरे यांच्या उमेदवारीवरुन काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत नाराजी असल्याची चर्चा होती. नाना पटोले गटाच्या नाराजीचा फटका हंडोरे यांना बसला आहे.

दुसरीकडे शिवसेनेचे ५५ आमदार असताना शिवसेनेच्या दोन्ही उमेदवारांना ५२ मतं मिळाली आहेत. सचिन अहिर आणि आमशा पाडवी यांना २६-२६ मतं मिळाली आहेत. त्यामुळे शिवसेनेची ३ मतं फुटली असल्याची चर्चा आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे ५१ आमदार आहेत. पण राष्ट्रवादीचे रामराजे नाईक निंबाळकर यांना २९ मते आणि एकनाथ खडसे यांना २८ मते मिळाली आहेत. म्हणजेच राष्ट्रवादीला ६ मतं जास्तीची मिळाली आहेत. एकनाथ खडसे यांनी आपल्याला मिळालेली अतिरिक्त मतं ही भाजपमधील आपल्या मित्रांनी दिली असल्याचा दावा केला आहे.

Tags:    

Similar News