ठाकरे सरकार कोसळलं, उध्दव ठाकरे यांचा राजीनामा
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर उध्दव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे.
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्य सरकार अल्पमतात आले होते. तर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उध्दव ठाकरे यांना बहूमताची चाचणी करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर आता उध्दव ठाकरे यांनी राजीनामा दिला आहे.
शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण झाली होती. त्यातच भाजपने राज्यपालांची भेट घेत सरकार अल्पमतात असून राज्यपालांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना बहूमताची चाचणी घेण्याचे आदेश दिले होते. या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. मात्र सर्वोच्च न्यायालयाने बहुमताची चाचणी स्थगित करण्यास नकार दिला. त्यामुळे अखेर उध्दव ठाकरे यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. तर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा राजीनामा अनिल परब यांच्या मार्फत राजभवनला देण्यात आला आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडी सरकार कोसळले आहे.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर आपला राजीनामा दिला आहे. तसंच उध्दव ठाकरे यांनी विधानपरिषद सदस्यत्वाचाही राजीनामा दिला आहे.
संध्याकाळी ६ वाजल्यापासून सर्वोच्च न्यायालयात दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तीवाद झाला. तर या युक्तीवादानंतर सर्वोच्च न्यायालयाने महाविकास आघाडीला धक्का दिला. तर बहुमत चाचणी करण्याचे आदेश दिले. त्यामुळे सरकार अल्पमतात आल्याने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राजभवनला आपला राजीनामा दिला आहे.