सुनिल प्रभूंचा व्हीप आम्हाला लागू होत नाही, एकनाथ शिंदे व्हीपवरून आक्रमक

Update: 2022-07-02 15:04 GMT

३ जुलै रोजी विधानसभा अध्यक्षपद निवडणूक होणार आहे. त्यासाठी शिवसेनेने एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर आमदारांनाही व्हीप बजावला आहे. त्यावरून एकनाथ शिंदे आक्रमक झाले आहेत.

दहा दिवसाच्या सत्तानाट्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यामुळे राज्याच्या राजकारणात रंगत आली आहे. तर त्यापाठोपाठ राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विशेष अधिवेशन बोलवले आहे. तर या अधिवेशनात बहुमत चाचणी आणि विधानसभा अध्यक्षपदाची निवड होणार आहे. त्यासाठी शिवसेनेचे प्रतोद सुनिल प्रभू यांनी व्हीप बजावला आहे. मात्र हा व्हीप आम्हाला लागू होणार नसल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे.

विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपकडून राहुल नार्वेकर यांना तर शिवसेनेने कोकणातील राजापूर मतदार संघातील आमदार राजन साळवी यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे विधानसभाध्यक्षपदाची निवडणूक जोरदार रंगणार आहे. दरम्यान ही निवडणूक जिंकण्यासाठी दोन्ही बाजूंनी चंग बांधला आहे. तर या निवडणूकीसाठी शिवसेनेचे प्रतोद सुनिल प्रभू यांनी व्हीप बजावला आहे. या व्हीपवर प्रतिक्रीया देतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, शिवसेनेने जारी केलेला व्हीप आम्हाला लागू होत नाही. आमच्याकडे दोन तृतियांश आमदारांचे संख्याबळ आहे. त्यामुळे आम्ही बहुमत सिध्द करू, असंही मुख्यमंत्री म्हणाले.

सुनिल प्रभू यांनी शिवसेनेच्या 55 आमदारांना विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणूकीसाठी व्हीप जारी केला आहे. त्यामध्ये त्यांनी शिवसेनेचे उमेदवार राजन साळवी यांना मतदान करण्यास सांगितले आहे. मात्र हा व्हीप एकनाथ शिंदे गटाने धुडकावून लावला आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणूकीत नेमकं काय घडणार हे पहावं लागणार आहे.

Tags:    

Similar News