शिवसेनेवरील वर्चस्वासाठी एकनाथ शिंदे यांची आणखी एक खेळी?

Update: 2022-07-28 08:49 GMT

उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध बंड केल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत तब्बल ४० आमदार आले आहेत. तर १२ खासदार देखील एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले आहेत. दुसरीकडे शिवसेनेवर वर्चस्व कुणाचे हा वाद देखील सुप्रीम कोर्ट आणि निवडणूक आयोगाकडे गेला आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते लीलाधर डाके यांची त्यांच्या चेंबूर येथील निवासस्थानी जाऊन भेट घेतली.

लीलाधर डाके यांनी बाळासाहेब ठाकरेंसोबत शिवसेना वाढीसाठी प्रचंड मेहनत घेतली, त्यामुळे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांची सदिच्छा भेट घेतल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. पण आता आमदार, खासदारांनंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी सुरू केल्याने राजकीय चर्चेला सुरूवात झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी गुरूवारी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांना त्यांच्या घरी जाऊन वाढदिवसा निमित्त शुभेच्छा दिल्या होत्या. आता मुख्यमंत्री शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची देखील भेट घेणार असल्याची चर्चा आहे.

उद्धव ठाकरे यांनी हकालपट्टी केलेल्या पदाधिकाऱ्यांची पुनर्नियुक्ती करण्यापासून उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील वर्चस्वाला आव्हान देणारे अनेक निर्णय एकनाथ शिंदे यांनी घेतले आहेत. दुसरीकडे खरी शिवसेना आम्हीच आहोत, असाही दावा ते करत आहे. या पार्श्वभूमीवर अनेक शिवसैनिक शिंदे गटात सहभागी होत असताना आता ज्येष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी त्यांनी सुरू केल्याने उद्धव ठाकरेंविरोधात ही नवी खेळी असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

Tags:    

Similar News