एकनाथ शिंदे फेल, राष्ट्रपती पदाच्या निवडणूकीतील दावा ठरला फोल

एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या पाठींब्याने मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर राष्ट्रपती पदाच्या निवडणूकीत राज्यातून 200 मतं मिळतील, असा दावा केला होता. मात्र निकालानंतर एकनाथ शिंदे हे फेल ठरल्याचे दिसून आले आहे.;

Update: 2022-07-22 04:19 GMT

राष्ट्रपती पदाच्या निवडणूकीत भाजप उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना राज्यातून 200 मतं मिळतील, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला होता. मात्र राज्यातून द्रौपदी मुर्मू यांना 200 मतं मिळवून देण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रणनिती फेल ठरली. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तोंडघशी पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

राज्य विधानसभेच्या 288 सदस्यांपैकी 200 मतं भाजपच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना मिळवून देण्यात येतील, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला होता. मात्र द्रौपदी मुर्मू यांना राज्यातून 181 तर यशवंत सिन्हा यांना 98 मतं मिळाली. त्यामुळे एकनाथ शिंदे यांचा दावा फोल ठरला.

द्रौपदी मुर्मू यांना शिवसेनेतील शिंदे आणि ठाकरे गटाचा पाठींबा होता. तसेच भाजपसह मित्रपक्षांचाही पाठींबा होता. तर राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षातील अंतर्गत धुसपुशीमुळे द्रौपदी मुर्मू यांना 200 मतं मिळतील, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला होता. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अपेक्षित असलेली मतांची फाटाफूट झाली नाही. त्यामुळे शिंदे हे मतांची जुळवा जुळव करण्यात फेल ठरल्याची चर्चा आहे.

शिंदे-फडणवीस सरकारच्या बहुमत चाचणीवेळी 164 सदस्यांनी पाठींबा दिला होता. तर राष्ट्रपती पदाच्या निवडणूकीत भाजपच्या द्रौपदी मुर्मू यांना शिवसेनेच्या आणखी 15 सदस्यांनी पाठींबा दिला होता. त्यामुळे मतांची बेरीज ही 179 इतकी झाली. तर राष्ट्रपती पदाच्या निवडणूकीच्या मतदानावेळी भाजप आणि शिंदे गटाचा प्रत्येकी एक आमदार गैरहजर होता. त्यामुळे शिंदे यांच्या दाव्यापेक्षा एकूण 19 मतं कमी मिळाले. मात्र दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे 51 तर काँग्रेसच्या 44 मतांसह यशवंत सिन्हा यांना 98 मतं मिळाली. परंतू बहुमत चाचणीच्या वेळी महाविकास आघाडीच्या बाजूने 99 मतं होते.

द्रौपदी मुर्मू या आदिवासी समाजाच्या असल्याने सर्वांनी त्यांना पाठींबा द्यावा, अशी विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. मात्र त्यानंतरही विरोधी आघाडीच्या मतांमध्ये फुट पाडण्यात शिंदे यांना अपयश आले आहे. त्यामुळे पहिल्याच घासाला खडा लागावा, अशी स्थिती एकनाथ शिंदे यांची झाली असल्याचे राजकीय विश्लेषक सांगतात.

Tags:    

Similar News