मुख्यमंत्र्यांची दिल्लीत खासदारांसोबत डिनर डिप्लोमसी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर शिवसेनेत उभी फुट पडली. तर आमदारांपाठोपाठ खासदारही शिंदे यांच्या गटात सहभागी होण्याची चर्चा आहे. दरम्यान एकनाथ शिंदे हे दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यापार्श्वभुमीवर चर्चांना उधाण आले आहे.
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्या दिल्ली वाऱ्यांमध्ये वाढ झाली आहे. तर सत्तास्थापनेनंतर मुख्यमंत्री शिंदे हे दुसऱ्यांदा दिल्ली दौऱ्यावर आहेत. तर आमदारांपाठोपाठ शिवसेनेतील खासदारही बंडाच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. त्यापार्श्वभुमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा महत्वाचा ठरणार आहे.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोमवारपासून दिल्ली दौऱ्यावर आहेत. सोमवारी रात्री ११ वाजता ते दिल्ली विमानतळावर उतरले. त्यानंतर त्यांनी विमानतळाशेजारी असलेल्या एका हॉटेलला भेट दिली. या हॉटेलमध्ये शिवसेनेतून बाहेर पडलेल्या १२ फुटीर खासदारांचा गट थांबला होता. यावेळी मुख्यमंत्र्यांनी या खासदारांसोबत जेवण केले आणि त्यानंतर या ठिकाणाहून बाहेर पडले.
यावेळी माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ही बैठक ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात होती. त्यासाठी वकीलांसोबत बैठक घेतली. मात्र ही बैठक ओबीसी आरक्षणासाठी असल्याचं मुख्यमंत्र्यांचं म्हणणं असले तरीही हॉटेल बाहेर अनेक खासदारांच्या गाड्या होत्या. ही बैठक संपल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्र सदनाकडे रवाना झाले. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदारांसोबत डिनर डिप्लोमसी केल्याची चर्चा दिल्लीच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.