मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांना टोला

Update: 2022-07-13 12:18 GMT

उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला आहे. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. गुरू पौर्णिमेनिमित्त ठाण्यातील आनंदाश्रमात ते आले होते. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या प्रतिमांच्या पुजेनंतर मुख्यमंत्री पत्रकारांशी बोलत होते. उध्दव ठाकरे यांनी जी आता भुमिका घेतली आहे, ती भुमिका ही अडीच वर्षापूर्वीच घेतली असती तर आज आमच्यावर ही वेळ आली नसती असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांना लगावला.

"शिवसेनेच्या सर्व खासदारांची हीच भूमिका होती, आम्ही देखील त्यांना आधीच पाठींबा दिलेला आहे. एका आदिवासी महिलेला राष्ट्रपतीपदावर नेण्याचे काम पंतप्रधान मोदी यांनी केले आहे. त्यामुळे ज्यांनी ज्यांनी त्यांना पाठिंबा दिला त्यांचे स्वागत आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

सध्या राज्यातील सरकार स्थिर आहे, तसेच सामान्यांसाठी हे सरकार काम करणार आहे, असे सांगत सरकार कोसळेल या शरद पवार यांच्या भाकीतावर मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली.

तसेच बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वावर आधारित भूमिका आम्ही घेतल्याने आमदार, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पक्षाचे पदाधिकारी पाठींबा देत असल्याचाही दावा त्यांनी केला. संपूर्ण राज्यातून प्रतिसाद मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले. उल्हासनगरमधील १८ नगरसेवक, नाशिक, दिंडोरी आणि नगर येथील शिवसेना नगरसेवकांनी देखील एकनाथ शिंदे यांची भेट घेत त्यांच्या गटाला समर्थन दिले आहे.

Tags:    

Similar News