उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाला थेट आव्हान देत मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेल्या एकनाथ शिंदे यांनी आता पक्ष संघटनेवर आपली पकड मजबूत करण्याच्या दृष्टीने पावलं उचलण्यास सुरूवात केली आहे. नरेश म्हस्के यांची शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख या पदावर पुनर्नियुक्ती करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. नरेश म्हस्के यांची उद्धव ठाकरे यांनी पदावरुन हकालपट्टी केली होती.
शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या ४० आमदारांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर म्हस्के यांनी शिंदे यांचे समर्थन केले होते. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी नरेश म्हस्के यांच्यावर कारवाई केली आहे. पण आता ही हकालपट्टी शिंदे यंनी बेकायदेशीर ठरवली आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्ववादी विचारांचा ध्वज हाती घेणाऱ्या कट्टर शिवसैनिकांला पदावरून हटविण्याचे अधिकार 'सामना'ला नाहीत, असे म्हणत जिल्हाप्रमुखपदी नव्या जोमाने काम करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नरेश म्हस्के यांना दिले आहेत. गुरूवारी रात्री नरेश म्हस्के यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. त्यावेळी जिल्हाप्रमुख पदाची सुत्रं पुन्हा म्हस्के यांच्या हाती सोपवण्यात आली. एवढेच नाही तर ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील पक्ष विस्ताराच्या कामाला लागण्याचे आदेस मुख्यमंत्र्यांनी त्यांना दिले.
एवढेच नाही तर उद्धव ठाकरे यांनी हकालपट्टी केलेल्या शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांची पुन्हा एकदा त्याच पदांवर पुनर्नियुक्ती करण्याचा निर्णयही शिंदेंनी घेतला आहे.
शिवसेनेच्या घटनेनुसार कोणत्याही पदाधिकाऱ्याला त्याचे म्हणणं ऐकून घेतल्याशिवाय तडकाफडकी पक्षातुन काढून टाकणे हे पूर्णपणे बेकायदेशीर आहे. त्यासाठी त्या पदाधिकाऱ्याला रीतसर नोटीस देऊन त्यांचं म्हणणं मांडण्याची संधी द्यावी लागते. मात्र अशा कोणत्याही प्रक्रियेचा अवलंब नरेश म्हस्के यांना पदावरून काढताना अनुसरण्यात आलेला नाही. त्यामुळे त्यांची हकालपट्टी बेकायदेशीर ठरत असून त्यांची पुन्हा त्याच पदावर पुनर्नियुक्ती करण्याचा निर्णय घेतल्याचे शिंदे गटाचे म्हणणे आहे.