उद्धव ठाकरेंना शह देण्यासाठी एकनाथ शिंदेंची मोठी खेळी
राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीच्या आधी शिंदे गटाने मोठी खेळी खेळली आहे.;
शिवसेनेवर वर्चस्व कुणाचे याचा फैसला होण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. यावरील सुनावणी ३ ऑगस्ट रोजी होणार आहे. या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आपल्या बाजूने येईल असा दावा उद्धव ठाकरेंतर्फे केला जात आहे. पण याच पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक मोठी खेळी खेळली आहे.
सर्वोच्च न्यायालयात तत्कालीन विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी शिंदे गटातील १६ आमदारांना अपात्रतेची नोटीस पाठवली होती. या अपात्रतेच्या नोटिशीविरोधात एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर आमदारांनी याचिका दाखल केली होती. पण आता सर्वोच्च न्यायालयानं १६ आमदारांच्या अपात्रतेचे प्रकरण निकाली काढावे, अशी विनंती शिंदे गटाने केली आहे.
शिंदे गटातर्फे कोणकोणते मुद्दे मांडण्यात आले आहेत?
१. विधानसभा अध्यक्ष आणि निवडणूक आयोगाकडे प्रकरण प्रलंबित असल्याने कोर्टानं याचिका रद्द करावी
२. 'शिवसेना' नाव आणि चिन्हाचा वाद निवडणूक आयोगाकडे आहे.
३. चिन्ह आणि नावाबाबत निवडणूक आयोग निर्णय घेईल.
४. १६ आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यांवर विधानसभा अध्यक्ष निर्णय घेतली
५. लोकशाहीत आणि विधीमंडळात संख्याबळाला महत्त्व आहे, संख्याबळ आमच्या बाजूने आहे.
६. सुनील प्रभू यांना प्रतोद नेमले, परंतु अपु-या संख्याबळावरील ही नियुक्ती आहे. सुनील प्रभूंच्या बाजूने पुरेसे आमदार नाहीत.
७ मुख्यमंत्र्यांनी स्वतः राजीनामा दिला आहे, त्यामुळे तेव्हाच सरकार कोसळले.
८. मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर सरकार स्थापन करण्यासाठी बोलावणे हा राज्यपालांचा अधिकार आहे.
९ विधानसभा उपाध्यक्षांवर आम्ही अविश्वास ठराव आणला होता. त्यावर कार्यवाही होणे गरजेचे होते, त्यामुळे ते १६ आमदारांना अपात्र ठरवू शकत नाहीत.
१०. विद्यमान विधानसभा अध्यक्षांकडे अपात्र आमदारांचे प्रकरण प्रलंबित आहे. तेच यावर निकाल देतील.
११ सर्वोच्च न्यायालयात याचिकेवर सुनावणी घेण्याची आवश्यकता नाही, प्रकरण निकाली काढावे