क्षणाचाही विलंब न लावता कानडी अत्याचाराची दखल घ्या; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पंतप्रधानांना आवाहन
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज केवळ आमचेच नाहीत तर संपूर्ण देशाचे दैवत आहेत. त्यांचा अवमान तर दूर, कणभर अनादरही खपवून घेणार नाही. कर्नाटकामधील मराठी जनतेवरील कानडी अत्याचार थांबवून विकृत मनोवृत्तीचा बिमोड करण्यासाठी पंतप्रधानांनी क्षणाचाही विलंब न लावता स्वतः लक्ष घालावे आणि संबंधितांवर कडक कारवाई करण्यास सांगावे अशा तीव्र शब्दांमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात.
बंगळुरूमधील घटनेची कसून चौकशी करायलाच हवी. या प्रकाराकडे डोळेझाक करू नका असे सांगून मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, गेले कित्येक वर्ष कर्नाटकातील मराठी बांधवांवर अत्याचार केला जात आहे आणि आता तर शिवरायांसारख्या आराध्य दैवताची विटंबना करण्याची घटना घडते आणि तेथील सरकार याकडे डोळेझाक करते हे दुर्दैवी आहे. वाराणसीत काशी विश्वेश्वराच्या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात, देशाची संस्कृती चिरडण्याचा जेव्हा जेव्हा प्रयत्न झाला तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांसारखे पराक्रमी राजे निर्माण झाले असे कौतुकोद्गार काढले होते. या कार्यक्रमास काही दिवस झाले नाही तोच, भाजप शासित राज्यात याच शिवरायांची विटंबना होते, आणि कुणावर कारवाई न करता उलट मराठी माणसाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतो हे अतिशय निषेधार्थ आहे आणि असे उद्धव ठाकरे म्हणाले.
राज्यात कुणाचेही सरकार असो पण दैवते बदलत नाहीत सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, हा कानडी अत्याचार बंद करण्यासाठी आता पंतप्रधानांनी क्षणाचाही विलंब न लावता तातडीने तेथील राज्य सरकारला आदेश द्यावेत आणि या विकृत मनोवृत्तीचा बिमोड करण्यास सांगावे.