अफगाणिस्तानची राजधानी काबूलवर तालिबानच्या बंडखोरांनी ताबा मिळवल्यानंतर आता अफगाणिस्तानात अराजक सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. तालिबानींच्या भीतीने देश सोडून बाहेर पळून जाण्याचा प्रयत्न इथले हजारो नागरिक करत आहे. याच पार्श्वभूमीवर काबूल विमानतळावर मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने सैनिकांनी हवेत गोळीबार केल्याचा प्रकार घडला आहे. यासंदर्भात काही परदेशी वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार काही प्रत्यक्ष दर्शींनी ५ जणांचे मृतदेह पाहिल्याचा दावा केला आहे.
पण या लोकांचा मृत्यू गोळीबारामुळे झाला आहे की चेंगराचेंगरीमध्ये झाला आहे, हे अजून स्पष्ट झालेले नाही. पण विमानात जागा मिळावी यासाठी लोक जिवाच्या आकांताने प्रयत्न करत आहेत. काही परदेशी पत्रकारांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केले आहेत. यानुसार शेकडो लोक विमानात प्रवेश मिळण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अनेकांनी तर विमानावर उड्य़ा मारल्याची दृश्यही व्हायरल झाली आहेत. उड्डाणासाठी निघालेल्या विमानाच्या पुढे शेकडो लोक धावत असल्याचेही दिसते आहे.
दरम्यान तालिबानच्या बंडखोरांनी अध्यक्षीय प्रासाद ताब्यात घेतला आहे. तसेच लवकरच तालिबान सत्ता स्थापनेची घोषणा करणार आहे. दरम्यान अफगाणिस्तानचे अध्यक्ष अशरफ घनी यांनी आपण रक्तपात टाळण्यासाठी देश सोडल्याचे जाहीर केले आहे. दरम्यान काबबलच्या हमीद करझाई विमानतळावर झालेल्या गोंधळामुळे एअर इंडियाची दिल्ली-काबूल विमानसेवा स्थगित करण्यात आली आहे.