बंद खोलीतल्या 'त्या' चर्चेबाबत रावसाहेब दानवे यांचा गौप्यस्फोट

शिवसेना आणि भाजपमध्ये मुख्यमंत्रीपदाचा फॉर्म्युला ठरला होता, याबाबत अनेक दावे-प्रतिदावे केले जात आहेत. पण आता याच बैठकीला आपण उपस्थित होतो, असा दावा करत केंद्रीय मंत्र्यांनी तो फॉर्म्युला जाहीर केला आहे.

Update: 2022-07-19 10:10 GMT

अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाचा फॉर्म्युला भाजपने निवडणुकानंतर अमान्य केल्याचा आरोप उद्धव ठाकरे वारंवार करत असतात. त्यामुळेच आपण भाजप सोडून महाविकास आघाडीत सामील झालो अशीही भूमिका उद्धव ठाकरे यांनी वारंवार मांडली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

शिवसेना आणि भाजपमध्ये मुळात अडीच अडीच वर्षांचा फॉर्म्युला ठरला होता का, याबाबत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कानावर हात ठेवले आहेत. अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी काय बोलणी केली होती, माहिती नाही, असे फडणवीस यांनी याआधीच स्पष्ट केले होते. तर अमित शाह यांनी बंद दाराआडच्या चर्चा सार्वजनिक करायच्या नसतात असे म्हणत उद्धव ठाकरे यांच्या आरोपाला उत्तर देणे टाळले होते.

पण आता राज्याच्या राजकारणाला वेगळं वळण देणाऱ्या त्या बंद दाराआडच्या चर्चेत नेमके काय ठरले होते, याची माहिती भाजपचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष आणि आताचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी उघड केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्र्यांची रावसाहेब दानवे यांच्यासह काही केंद्रीय मंत्र्यांनी भेट मंगळवारी घेतली.

यावेळी पत्रकारांशी बोलताना रावसाहेब दानवे यांनी सांगितले की, उद्धव ठाकरे यांना स्वतःला मुख्यमंत्री व्हायचं होतं म्हणून ते कॉंग्रेस राष्ट्रवादी सोबत गेले. अमित शाह आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत बंद खोलीत झालेल्या बैठकीत आपण देखील होता, कारण तेव्हा आपण भाजपचे प्रदेशाध्यक्ष होतो. त्या बैठकीत ज्याच्या जागा जास्त त्याचा मुख्यमंत्री असा फॉर्म्युला ठरला होता. जागा वाटपाबाबत चर्चा झाली होती पण मुख्यमंत्री पदाबाबत चर्चा झाली नव्हती असा दावा यांनी केला आहे.

Tags:    

Similar News