राज्यातील महाविकास आघाडी सरकार येत्या मार्च महिन्यात पडेल आणि भाजप सरकार स्थापन करेल असा दावा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शुक्रवारी केला. त्यांच्या या दाव्याला केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीही दुजोरा देत मार्च किंवा एप्रिल महिन्यात भाजप आणि शिवसेना सरकार स्थापन करतील असा दावा केला आहे.
"अडीच वर्ष पूर्ण झाले की, पुन्हा शिवसेना आणि भाजपा एकत्र येणार आहे. मार्च किंवा एप्रिलमध्ये सत्ता बदल होईल, त्यामुळे मंत्री नारायण राणे यांचे वक्तव्य बरोबर आहे,"असे आठवले यांनी म्हटले आहे. नारायण राणे यांनी सत्ता बदलाचा दावा केल्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी खिल्ली उडवली होती.
भाजपच्या नेत्यांकडून वारंवार सत्ता बदलाचे दावे केले जात आहेत. पण काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांनी वारंवार ही शक्यता फेटाळून लावली आहे, तसेच सरकार पाच वर्षे पूर्ण करणार असाही निर्धार व्यक्त केला आहे.